ओसामाला अगोदरच लागली होती गोळी

अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानातील अबोटाबाद येथील घरात घुसून अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोनी खातमा केल्याची ऐतिहासिक घटना अजूनही चर्चेत असली तरी आता या ऑपरेशनमध्ये प्रत्यक्ष सामील असलेल्या एका सील कमांडोच्या आत्मचरित्रामुळे अमेरिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती कांहीशी दिशाभूल करणारी आणि संशयास्पद असल्याचे संकेत मिळत आहेत.

२०११ च्या मे महिन्यात दोन तारखेला पार पाडण्यात आलेल्या या साहसी मोहिमेतील एका कमांडोने नो इझी डे या पुस्तकात या मोहिमेचे वर्णन केले आहे. मार्क ओवेन अशा टोपण नावाने लेखकाने हे लिखाण केले असून त्यात तो म्हणतो की आम्ही अबोटाबादच्या घरात शिरून ओसामाला गोळ्या घालण्यापूर्वीच त्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी घुसलेली होती.लेखक म्हणतो, त्याच्या घराचा निमुळता जिना चढून आम्ही वर जात होतो आणि तिसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी दोनतीन पायर्‍याच चढायच्या राहिलेल्या असतानाच आम्हाला दारात एक डोके  दिसले मात्र त्यापाठोपाठच बंदूकीच्या गोळ्या झाढल्याचे आवाजही आले. गोळी संबंधित इसमाला लागली की नाही हे त्यावेळी आम्हाला कळले नाही मात्र ती आकृती खोलीत अंधारात अदृष्य झाली.

आम्ही खोलीत प्रवेश केला तेव्हा ओसामा जमिनीवर पडला होता व एक महिला त्याच्या अंगावर रेलून आक्रोश करत होती.त्याच्या अंगात पांढरा बिनबाह्याचा टी शर्ट, ढगळ पँट होती पण हातात हत्यार नव्हते डोक्यातून रक्त वाहात होते आणि मेंदू फुटला होता.माझ्याबरोबर असलेल्या अन्य एका कमांडोने आणि मी क्षणाचाही विचार न करता त्याच्या छातीत गोळ्या घातल्या. खोलीत एक एके ४७ पडलेली होती. तो ठार झाल्याचे नक्की झाल्यावर आम्ही अन्य महिलांना तेथे बोलावले व त्याची ओळख पटविली तेव्हा तो ओसामा लादेनच असल्याचे स्पष्ट झाले.

या मोहिमेबाबत अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ओसामाने सील कमांडोवर उलट गोळीबार केल्याचे व चाळीस मिनिटे ही धुमश्चक्री सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र ओवेनच्या मते केवळ पंधरा मिनिटातच घरात घुसणे, ओसामाला शोधणे हे कार्यक्रम पार पडून ही दणादणी संपली होती आणि त्यांना कुठेच प्रतिकार झाला नव्हता. आमच्या या मोहिमेला ओबामांनी परवानगी दिली तेव्हा आम्हाला खूपच आनंद झाला असे सांगून ओवेन लिहितो की ही कामगिरी फत्ते झाली की त्याचे सारे श्रेय अध्यक्ष स्वतःकडे घेणार याची आम्हाला पूर्ण कल्पना होती तसेच आगामी निवडणुकातही याचा वापर ते करून घेणार हेही आम्ही ताडले होते.

विशेष म्हणजे या कमांडोची प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग याने भेट घेतली असून त्याच्या या आत्मचरित्रावर स्पिलबर्ग चित्रपट तयार करणार आहे असेही समजते.

Leave a Comment