संशोधकांना कधी कसली स्वप्ने पडतील याचा अंदाज करणे कठीणच. गेली पन्नास वर्षे अंतराळ संशोधनातील संशोधक रॉकेटशिवायच मानवाला अंतराळात नेणारी लिफ्ट किवा इलेव्हेटर बनविण्याची स्वप्ने पाहात आहेत. मायकेल लेन हा संशोधकही त्याला अपवाद नाही. मात्र तो केवळ स्वप्न पाहून थांबलेला नाही तर गेली ११ वर्षे तो त्यासाठी संशोधन करतो आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे यासाठी मायकेल ने नासाच्या इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स कन्सेप्ट रिसर्च टीममध्ये काम केले आहे. नंतर त्याने लिफ्ट पोर्ट नावाच्या खासगी कंपनीबरोबर अशी लिफ्ट तयार करण्याचा करारही केला मात्र नंतर ही कंपनीच बंद पडली.
मायकेलने हार मानलेली नाही. आता त्याने परत लिफट पोर्ट सुरू केली असून आपल्या या प्रयोगाची प्रसिद्धी करण्यास सुरवात केली आहे. यावेळी ही लिफ्ट पृथ्वीऐवजी चंद्रावर बसवायची त्याची कल्पना आहे. कारण चंद्रावर वातावरण नाही त्यामुळे गुरूत्वाकर्षणाचा अडथळा नाही. त्यामुळे लिफटसाठी जे दोरखंड हवेत ते फारसे मजबूत नसले तरी चालणार आहे असे त्याचे म्हणणे आहे. ही लिफ्ट प्रत्यक्षात उतरविण्यासाठी लेनने जाहिरातीद्वारे पैसा गोळा करायला सुरवात केली असून सध्या ८ हजार डॉलर्स पुरेसे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र चंद्रावर जाऊन हे काम करावे लागणार असल्याने कदाचित हा खर्च ८०० दशलक्ष डॉलर्सही असेल असेही तो सांगतो आहे. देणग्यांसाठी त्याने चालविलेल्या प्रचार मोहिमेला गुरूवारपासून सुरूवात झाली असून आत्तापर्यंत ३५ हजार डॉलर्सचा निधी गोळा झाला आहे. अजून १४ दिवस निधी घेतला जाणार आहे. मानवी संस्कृतीत आमुलाग्र बदल घडवून आणणार्या या मोहिमेत सामील होण्यासाठी कमीत कमी १ डॉलर दिला तरी तो स्वीकारला जाईल असेही मायकेलने स्पष्ट केले आहे.