२६/११ च्या तपास पथकाला विशेष पारितोषिक: मुख्यमंत्री

मुंबई: २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसब याच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने राज्याच्या तपास यंत्रणांची क्षमता सिद्ध झाली असून या हल्ल्याचा तपास करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना विशेष पारितोषिक देण्यात येईल; अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव जयंतकुमार बाठिया आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्या न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही. याबाबत पोलीस दलाने विशेष लक्ष देऊन हे प्रमाण वाढविण्याचे आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. रस्ता रोको, रेल रोको, मोर्चे, निदर्शने याद्वारे सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न करण्याची वृत्ती वाढीस लागली असून आंदोलने हाताळण्यासाठी सुसंवादाचा मार्ग पोलिसांनी अंगीकारावा; असे आवाहनही त्यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याबाबत पोलिसांनी तत्पर असण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

तपासाला गती देण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला २५ हजार रुपयांचा तपास भत्ता देण्याची तरतूद लवकरच केली जाईल; अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

Leave a Comment