साखरकारखान्यांनी चारा छावण्या उभाराव्या: मुख्यमंत्री

पुणे: दुष्काळाच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

ऊस गाळप हंगाम २०१२-१३ चा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योगमंत्री नारायण राणे, वनमंत्री पतंगराव कदम, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, साखरसंघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक साखरकारखान्याने आपल्या क्षेत्रात किमान पाच ते सात चार छावण्यांचे नियोजन करावे. या छावण्यांमध्ये २५० जनावरांची व्यवस्था करता येईल. मोठ्या पणनसंस्था, दूध उत्पादन संस्था, सहकारी संस्था यांनी याबाबत सहकार्य करावे; अशी सूचना चव्हाण यांनी केली.

मागील हंगामात समाधानकारक पावसाने राज्यात ऊसाचे विक्रमी उत्पादन झाले. यावर्षी पावसाअभावी उसाच्या उत्पादनात घट होणार असून शेतकऱ्यांनी बियाण्यात बदल, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत गांभीर्याने विचार करावा; असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.