एम.एससी. इन न्यूट्रीशन

सध्या डोबिंग हा विषय फार चर्चिला जात आहे. भारताच्या काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महिला खेळाडू उत्तेजक पदार्थांच्या सेवनात दोषी आढळल्या असून त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांतून बाद करण्यात आले आहे. उत्तेजक घटकांच्या सेवनामुळे शरीरात तात्पुरती ताकद येते आणि तिचा स्पर्धा जिंकायला फायदा होतो. म्हणून खेळाडू या पदार्थांचे सेवन करीत असतात. निदान तसा आरोप तरी आहे. पण अशा सेवनाने आपले करीयर खराब होणार असेल तर त्या भानगडीत पडायला नको असाच सूज्ञपणाचा विचार कोणीही करणार. पण ही गोष्ट टाळणे म्हणावे तेवढे सोपे नाही. या संबंधातल्या नियमांत सतत बदल होत असतात आणि नवनवी औषधे प्रतिबंधित औषधांच्या यादीत सामील केली जात असतात. तेव्हा या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि सल्ला मिळाला नाही तर अज्ञानामुळे ते असे एखादे औषध घेतात की ज्यातून प्रतिबंधित घटक पोटात जातो. म्हणून त्यांना सतत सल्ला देणारे चांगले सल्लागार हवे असतात. अशी गरज निर्माण झाली की तिचा अभ्यासक्रम तयार होतोच.

एम.एससी. इन एक्जरसाईज, फिजियालॉजी अँड न्यूट्रीशन असा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. आपल्या देशात खेळाडूंना अशा सोयी आणि सल्लागार मिळाले, तर आपले खेळाडू जगात चांगलेच चमकतील. केवळ काय खावे आणि काय खाऊ नये याबाबतचाच सल्ला त्यांना हवा असतो असे नाही. त्यांना व्यायाम किती घ्यावा आणि शरीराची अवस्था कशी टिकवून ठेवावी याचेही मार्गदर्शन आवश्यक असते. निरनिराळ्या व्यायामाचे शरीराच्या स्नायूंवर काय परिणाम होतात. हृदयावर काय परिणाम होतात याचेही निरीक्षण आवश्यक असते. हा अभ्यासक्रम करताना या गोष्टी शिकवल्या जात असतात. फिटनेस हा शब्द आता सर्वांच्याच आयुष्यात परवलीचा झाला आहे. मोठ्या कंपन्यात कामे करणार्‍या अधिकार्‍यांना अनेक तास काम करावे लागते तरीही त्यांची प्रकृती चांगली असणे गरजेचे असते. ही गोष्ट साध्य करण्यासाठी त्यांना काय करावे लागेल याचा सल्ला गरजेचा असतो. अगदी श्रीमंत कुटुंबातल्या गृहिणीही मोठी फी देऊन फिटनेसच्या टिप्स घ्यायला लागल्या आहेत. सध्या बी. एससी.च्या पातळीवर फूड टेक्नालॉजी हा विषय आहे. ही पदवी घेताना विद्यार्थ्यांना न्यूट्रीशन,फिजियालॉजी आणि एक्झरसाईज या विषयांची वरवरची माहिती दिली जाते.

एम.एससी. किंवा पदव्युत्तर पदविका करताना मात्र त्यांना हे विषय तपशीलात शिकता येतात आणि त्यांना सल्लागार म्हणून काम आणि उद्योगही करता येतो. भारतात आता अनेक विद्यापीठांत हे पदव्युत्तर पदवी किंवा पदविकेचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात एसएनडीटी विद्यापीठात बी.एससी. असणारांना एका वर्षात ही पदव्युत्तर पदविका मिळवता येईल.  

Leave a Comment