एच.आय.व्ही.शी संबंधित कोर्स

hiv

सध्या केवळ भारतच नव्हे तर सार्‍या जगातच एच.आय.व्ही. एडस् हा गंभीर प्रश्न होऊन बसलेला आहे आणि त्यावर औषध सापडत नसल्यामुळे तो अधिक गंभीर होत चालला आहे. हा विकार होणारच नाही अशी लस उपलब्ध नाही, हे खरे. या विकारावर औषध पूर्णपणे नाहीच असेही काही नाही. पण एडस्बाधित रुग्णाला काही औषधे देऊन या रोगातून पूर्ण मुक्त करता येईल असे औषध काही उपलब्ध झालेले नाही. काही औषधे अशी शोधून काढण्यात आलेली आहेत की ज्यामुळे एडसबाधित रुग्णाला काही दिवस जिवंत ठेवता येते. अन्यथा एडस् म्हणजे मृत्यूचे प्रमाणपत्रच. या औषधोपचारामुळे हा मृत्यू लांबवता तर येतोच पण लांबवलेल्या आयुष्यामध्ये रुग्णचे जगणे सुसह्य होते. सध्या अनेक रुग्णालयांमध्ये असे एडसबाधित रुग्ण दाखल आहेत. साधारणपणे इम्युनॉलाॅजी या शास्त्राच्या आधारे हे उपचार केले जातात.

परंतु आपल्या समाजात एडसच्या रुग्णांविषयी फार वाईट भावना पसरलेली आहे. त्यामुळे त्यांना चांगली वागणूक मिळत नाही आणि रुग्णालये त्यांना सहजासहजी दाखलही करून घेत नाहीत. त्यामुळे काही सामाजिक संस्था अशा रुग्णांची देखभाल करण्यास उत्सुक आहेत. अशा संस्थांमध्ये काम करणारे सेवाभावी डॉक्टर फार उच्च विद्या विभूषित असतीलच असे नाही. तेव्हा त्या डॉक्टरांना एच.आय.व्ही. बाधितांचे उपचार कसे करावे याची विशेष माहिती असण्याची गरज आहे.

अशा प्रकारचा एक अभ्यासक्रम इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (आय.जी.एन.ओ.यु.) अर्थात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पत्रद्वारा पूर्ण करता येतो आणि तो एक वर्षाचा आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एच.आय.व्ही. मेडिसीन असे त्याचे नाव आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी या विद्यापीठाला नॅशनल एडस् कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे. या अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक किवा प्रवेश अर्ज इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या कोणत्याही अध्यापन केंद्रावर उपलब्ध होऊ शकतो किंवा या विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुद्धा ऑनलाईन मिळू शकतो. हे संकेतस्थळ www.ignou.ac. In असे आहे. हा अभ्यासक्रम वैद्यकीय पदवी मिळविलेल्या पदवीधरांसाठी आहे. मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावरील समन्वयकाच्या साह्याने हा प्रवेश अर्ज भरून खालील पत्त्यावर पाठवावा. प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर, रुम नं. १४९, स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस, डी ब्लाॅक, रामन भवन, न्यू अकॅडमीक कॉम्प्लेक्स, आयजीएनओयू मैदान गरधी, नवी दिल्ली-११००६८. हे अर्ज या पत्त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत पोचावेत. अधिक माहितीसाठी मुक्त विद्यापीठाच्या कोणत्याही अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा.

Leave a Comment