मुंबई ड्रग्जसाठीचा ट्रान्झिट पॉईंट असल्याचा संशय

मुंबई दि.२९ – मुंबई शहर अमली पदार्थांसाठीचा ट्रान्झिट पॉईंट म्हणून उपयोगात आणले जात असावे असा निष्कर्ष तपास संस्थांनी काढला असून या अमली पदार्थ तस्करीत अनेक देशांचे अनेक नागरिक सहभागी असावेत असाही अंदाज बांधला जात आहे. अमली पदार्थ तस्करीचा हा प्रचंड मोठा आंतरराष्ट्रीय कट असल्याचे पुरावे देणारे धागेदोरे तपासपथकांना मिळाले आहेत असे वरीष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यात २४ ऑगस्टला मुंबई विमानतळावर इथिओपियन एअरलाईन्सने प्रवास करू पाहणार्‍या हरमन लकी या दक्षिण आफ्रिकन महिलेला कस्टम विभागाने पकडल्यानंतर तिची जी जबानी घेतली त्यात हा कट उघडकीस आणणारी बरीच माहिती तपास पथकांच्या हाती लागली आहे असे सांगण्यात येत आहे. लकी बंदी असलेल्या अॅफिथॅमिन या औषधी गोळ्यांचा १८ किलोचा साठा कपडे आणि बॅगेत लपवून मोझांबिककडे जाणार होती. मुंबई एअर इंटेलिजन्स युनिटने तिला संशयावरून पकडले होते व नंतर कस्टम विभाग व महसूल विभागाने तिची चौकशी केली होती.

लकीची चौकशी सुरू असतानाच तिला मोबाईलवर एका मोझांबियन नागरिकाकडून गप्प राहण्याचा व कायदेशीर मदत तिला दिली जाईल असा मेसेज आल्याने सावध झालेल्या तपास अधिकार्‍यांनी तिच्या सर्व फोन कॉल्स, टेकस्ट मेसेजेस चे डिटेल्स मिळविले तेव्हा हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपास अधिकार्‍यांनी त्वरेने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून संबंधित देशांकडून अधिक पुरावे गोळा करण्याची परवानगी मागितली असल्याचे समजते.

ही महिला मुंबईत राहात असताना तिची ओळख तिचा मित्र जोनाथन याने फिलिप नावाच्या इसमाशी करून दिली होती. ती नेत असलेल्या १८ किलो वजनाच्या या बंदी असलेल्या गोळ्या तिला इथिओपिनय नागरिकाने दिल्या होत्या असेही समजले आहे. वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या तस्करीत स्थानिक बडे मासे गुंतले आहेत काय यावर प्रथम लक्ष केंद्रीत केले जात असून हा साठा कुठून आला, कुणी दिला, अन्य शहरात याचे कांही धागेदोरे आहेत काय या तपासावरही लक्ष देण्यात येत आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागही या चौकशीत सहभागी झाला असून तस्करीचे हे मोठे आंतरराष्ट्रीय जाळेच असावे असा अंदाज त्यांनीही व्यक्त केला आहे.

Leave a Comment