कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर?

मुंबई दि.२८ – मुंबई महानगरपालिकेला अद्याप हवाई वाहतुकीचे नियमन करणार्‍या डीजीसीएकडून परवानगी मिळालेली नसल्याने महापालिकेचा कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पालिका एक सप्टेंबरपासून तलाव क्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरु करणार होती. पण डीजीसीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची जबाबदार कोणाची? तसेच, महापालिका कशा पध्दतीने प्रयोग करणार? असे मुद्दे डीजीसीएने उपस्थित केले आहेत.

हा प्रयोग सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवडयात सुरु होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या जलखात्याचे अभियंते आर.बी.बांबले यांनी सांगितले. सध्या सुरु असलेला पाऊस असाच कायम राहिला तर प्रयोग रद्दही होऊ शकतो. हवाई हद्दीच्या वापरासाठी डीजीसीए तसेच महाराष्ट्राच्या गृहखात्याची परवानगी आवश्यक आहे. महापालिकेला या प्रयोगासाठी वीस कोटीच्या आसपास खर्च येण्याची शक्यता आहे. यापूर्वी याच प्रयोगासाठी बारा कोटी रुपये खर्च आला होता. महापालिकेला धावपट्टीचेही भाडे भरावे लागते. इस्त्रायलची कंपनी हा प्रयोग करणार असून, भारतीय हवामान खातेही यामध्ये महापालिकेला सहकार्य करणार आहे. यापूर्वी अशा कृत्रिम पावसाचा प्रयोग अयशस्वी ठरल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने या प्रयोगाला तीव्र विरोध केला आहे.

Leave a Comment