किंगफिशरचे पायलट पुन्हा संपावर

मुंबई दि.२९ – किंगफिशर या डबघाईस आलेल्या विमान कंपनीच्या मुंबईतील पायलटनी बुधवारपासून पुन्हा बेमुदत संप पुकारला असून त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द होणार आहेत. मार्चपासून या कंपनीच्या पायलट, इंजिनिअर्ससह अन्य कर्मचार्‍यांना पगार मिळालेले नाहीत. कंपनी व्यवस्थापनाने पगार देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही यामुळे मुंबईतील पायलट पुन्हा संपावर गेले आहेत.

किंगफिशर ही खासगी विमान कंपनी गेले अनेक महिने आर्थिक चणचणीने त्रस्त आहे. कंपनीची सध्या फक्त १०० उड्डाणे होत असून ती दिल्ली आणि मुंबईतूनच होत आहेत. यापूर्वी कंपनीची दररोज ४०० उड्डाणे होत असत मात्र पैशांची चणचण असल्याने ही उड्डाणे कमी केली गेली आहेत. गेल्या दहा दिवसांत पायलटनी पुकारलेला हा दुसरा संप असून त्यामुळे उड्डाणांचे वेळापत्रक कोलमडणार आहे व परिणामी प्रवाशांना त्याची झळ बसणार आहे.

Leave a Comment