अमर जवान स्मारक फोडणाऱ्यांना अटक

मुंबई दि.२९ – आझाद मैदानाजवळ असलेल्या अमर जवान स्मारकाची तोडफोड करणार्‍या एकाला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल कादीर मोहम्मद अन्सारी(१९) असे त्याचे नाव असून तो जोगेश्वरी येथील रहिवासी आहे. अब्दुलला बिहार येथून अटक करण्यात आली आहे. तो बिहारमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. तसेच पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली असून हा आकडा आता ५५ वर गेला आहे.

अब्दुल अन्सारी याचे वडिल आणि तीन भाऊ हे मौलवी आहेत. त्यापैकी दोन भाऊ हे उत्तर प्रदेश आणि एक भाऊ हा मुंबईत असून त्याचे मोबाइल रिपेरिंगचे दुकान आहे. अब्दुलचे शिक्षण हे मदरशात झाल्याचे समजते. आझाद मैदानातील हिंसाचाराच्या पूर्वी अब्दुलने जोगेश्वरी येथील एका मदरशात आयोजित केलेल्या सभांना हजेरी लावलेली होती. अब्दुलने अमर जवानचे स्मारक फोडल्यानंतर तो घरी गेला. दोन दिवसांनी एका वृत्तपत्रात त्याचा फोटो छापून आला. फोटो छापून आल्यानंतर मुज्जफर एक्सप्रेसने तो बिहारला गेला. बिहार येथील सितामाळी येथे त्याच्या काकाच्या घरी काही दिवस तो वास्तव्यास होता.

गुन्हेशाखेची टीम अब्दुलच्या शोधात असतानाच, खबर्‍यांच्या माहितीवरून पोलिसांनी अब्दुलच्या घरचा शोध घेतला. घरच्यांची चौकशी केल्यानंतर अब्दुल हा बिहारला असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे अब्दुल हा बिहारमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यापूर्वीच पोलिसांनी अब्दुलला अटक केली. या स्मारकाची तोडफोड करणार्‍या दुसर्‍याचाही शोध लागल्याचे समजते. तो देखील जोगेश्वरी येथील रहिवासी असून हे दोघेजण मित्र आहेत.

Leave a Comment