शरीराच्या उबेवर करा मोबाईल चार्ज

मोबाईलची बॅटरी चार्ज करणारा शर्ट तयार केलेल्या डॉ.कॅरॉल यांनी यापुढे संशोधनात चांगलीच मजल मारली असून आता हातात धरताच चार्ज होणारी बॅटरी त्यांनी तयार केली आहे. नॅनो तंत्रज्ञानाचा त्यासाठी त्यांनी वापर केला आहे. अमेरिकेतील वेक फॉरेस्ट विद्यापीठात कॅरॉल कार्यरत आहेत.

आपल्या या नव्या संशोधनाविषयी माहिती देताना ते म्हणतात, नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून शरीरातील उष्णतेचे वीजेत रूपांतर करता येणे शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी मोबाईल हातात धरला तर चार्ज होऊ शकेल का यावर लक्ष केंद्रीत केले. त्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल फोनवर कार्बन ट्यूब असलेले अति सूक्ष्म जाळे प्लॅस्टीकच्या धाग्यांसह विणले. हे जाळे दिसते कापडासारखे. पण मोबाईल माणसाच्या शरीराच्या संपर्कात आला की शरीराच्या उष्णतेने कार्बन ट्यूबमधून वीजप्रवाह सुरू होतो व त्यावर मोबाईलची बॅटरी चार्ज होऊ लागते. केवळ मोबाईलची बॅटरीच नव्हे तर या तंत्रज्ञानाने शरीरातील उष्णतेतून निर्माण होणारी वीज बॅटर्‍या आणि रेडिओतही वापरता येणार असल्याचा त्यांचा दावा आहे. यामुळे भारनियमनाच्या काळात बॅटरी सुरू राहिल तसेच मोबाईलचा चार्ज संपला म्हणून संभाषण बंद पडण्याची समस्याही उद्भवणार नाही.

कॅरोल यांनी बॅटरी चार्ज करणारा जो शर्ट तयार केला होता त्याचा उपयोग सध्या खेळण्यातील बॅटर्‍या चार्ज करण्यासाठी केला जात आहे असेही समजते.