प्रत्यक्षात अवतरली उडणारी कार

अल्लाउद्दीन या अतिशय चलाख माणसाच्या करामती आपल्याला पुस्तकात वाचून माहिती आहेत. त्याच्याकडे ज्या अनेक अद्भूत वस्तू होत्या त्यात जादूच्या दिव्याप्रमाणे आकाशातून उडणारा गालिचाही होता. आता अगदी उडणारा गालिचा नाही मात्र त्याच धर्तीवर विमानाप्रमाणे आकाशात उडू शकणारी चार चाकी कार अमेरिक न एरॉनॉटिकल कंपनीने तयार केली असून त्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अनुदान दिले आहे.या गाडीचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन पुढील वर्षात सुरू होणार असून इच्छुक ग्राहक ती विकत घेऊ शकणार आहेत. अर्थात त्यासाठी भरभक्कम रक्कम मोजावी लागणार आहे.

या गाडीचे वैशिष्ठ म्हणजे या चारचाकी गाडीसाठी रस्त्यावर चालविताना लायसन्स लागेलच पण अवघ्या वीस सेकंदाच्या कालावधीत तिचे विमानात रूपांतर करता येणार आहे. अंदाजे पाचशे मैल ही गाडी उडू शकणार आहे.नंतर पुन्हा खाली उतरल्यावर गाडीचे पंख बंद करून रस्त्याने ही गाडी घरी नेऊन गॅरेजमध्ये पार्क करता येणार आहे. मॅसेच्युसेटसच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरॉनॉटिकल व अॅस्टाॅनॉटिकल विषयात पीएचडी मिळविलेल्या ४२ वर्षीय कार्ल डिट्रिच या संशोधकाने ही गाडी तयार केली आहे. तो सांगतो उडणारी कार म्हटले की लोक चेष्टा करतात पण आम्ही या कारबाबत अतिशय गंभीर आहोत आणि तिचे उत्पादन व विक्री करण्याची आमची मनीषा आहे.

कार्लने या गाडीसंबंधी संशोधन करण्याची सुरवात २००६ साली केली आणि सातत्याने प्रयत्न केल्यानंतर तो त्यात यशस्वी झाला. या कारची पहिली चाचणी २००९ साली न्यूयॉर्क स्टेट मध्ये घेण्यात आली आणि ती कमालीची यशस्वी ठरली. पुढच्या वर्षात पहिल्या दहा ग्राहकांसाठी ही गाडी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि २०१४ पासून तिचे नियमित उत्पादन सुरू होणार आहे. किंमत आहे २,७९,००० डॉलर्स. म्हणजे छोटया दोन सीटर विमानाइतकी. अर्थात ही गाडी हवेत न्यायची असेल तर साध्या रस्त्याचा उपयोग होणार नाही तर त्यासाठी रनवेच लागणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या कारचालकांना वाहतूक कोंडीतून चटकन उडून बाहेर पडण्याची संधी या गाडीमुळे मिळणार नाही हे लक्षात ठेवायला हवे.