मिस्टर युनिव्हर्सची जन्मशताब्दी

मनोहर आईच हे नांव कदाचित तुमच्या परिचयाचे नसेल. पूर्वीच्या अखंड भारतातला व आत्ताच्या बांगला देशातील हा साडेचार फुटापेक्षा थोडा उंच माणूस १९५२ सालचा मिस्टर युनिव्हर्स आहे आणि त्याने वयाची १०० वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. थोडी शिस्त आणि सत्याची कास हेच आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे असे सांगणार्‍या मनोहर यांची तब्येत आजही ठणठणीत आहेच पण मसल्स दाखविण्याची त्यांची अनोखी शैली विशेष आकर्षक आहे.

हृदयाने अजूनही तरूण असणारे मनोहर अगदी गरीब कुटुंबात जन्माला आले मात्र बॉडी बिल्डींगच्या ध्यासासाठी त्यांनी अनेक मार्ग चोखाळले. १९४२ साली ब्रिटीश रॉयल एअर फोर्स जॉईन केलेल्या मनोहर यांनी भारतीयांना हिणवल्याबद्दल ब्रिटीश अधिकार्‍यांच्या श्रीमुखात भडकावली होती आणि त्यासाठी तुरूंगवासही भोगला होता. मुलांवरही सत्याची कास आणि प्रामाणिक पणा या गुणांचा संस्कार करणारे मनोहर आजच्या आधुनिक जिम आणि स्पाच्या जमान्यात आजही लाल मातीतच अंगमेहनत करतात. त्यांनी अनेक शिष्य तयार केले आहेत आणि त्यातील कांही चक्क साठी ओलांडलेलेही आहेत. १०० वर्षे वयाच्या या स्पोर्ट आयकॉनची राज्याने अथवा केंद्राने मात्र अद्यापीही दखल घेतलेली नाही. त्यांना कोणताही सन्मान दिला गेलेला नाही मात्र त्याची अजिबात खंत नसलेल्या या मल्लाला आपले बाकीचे आयुष्य ही आरोग्यपूर्ण रितीनेच जगायचे आहे.

Leave a Comment