दारु पिऊन ८०० अल्पवयीन मुलांची ‘चिल्लर पार्टी’

पुणे,दि.२८ – येथील मुंढवा भागात रिव्हरव्ह्यू नावाच्या रिसॉर्टवर शनिवारी इयत्ता नववी ते अकरावी या वर्गातील आठशे मुले व मुली हे मद्य पार्टी करताना व एका पोहोण्याच्या तलावात डीजे संगीताच्या तालावर बेभान नाचताना सापडल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. हा रिव्हरव्ह्यू रिसॉर्ट केंद्रीय कृषीमंत्री शरदराव पवार यांचे पुतणे जयंत पवार यांच्या मालकीचा असल्याने वरील घटना घडून तीन दिवस झाले तरी अजून पोलीसांनी कसलीही तक्रार दाखल केलेली नाही. ‘आपण आयोजकांना सर्व अटी घालून कंपनी पार्ट्यांना ही जागा देतो असा बचाव श्री जयंत पवार यांनी केला आहे पण येथे वारंवार दुपारच्या वेळात जेंव्हा महागड्या पार्ट्या नसतात तेंव्हा निम्म्या दरात मुलांच्यासाठी अवघ्या चारशे रुपये प्रवेशफीत प्रवेश दिला जातो व मुलींना तर अशा पार्ट्या विनामूल्य असतात, त्यामुळे याही पार्टीत मुलींचीच संख्या अधिक होती, अशी अतिशय धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शनिवारी ही घटना घडूनही ती माहिती प्रसारमाध्यमापासून दूर ठेवण्यात आली पण त्यात सहभागी झालेल्या  मुलांच्या पालकांनीच ही घटना घडत असताना ती पोलीसांनाही कळविली आणि नंतर प्रसारमाध्यमांनाही कळविली. एकाच वेळेला अल्पवयीन अशी साडेसातशे ते आठशे मुले मुली अशा अतिशय आक्षेपार्ह पार्टीला कशी काय एकत्र आली या धक्क्यातून पोलीस व पालकही सावरले नाही.

दर्शिल चव्हाण आणि आशिश लिमये हे दोघे या पार्टीचे संयोजक होते. येथे पहिले काही पेग विनामूल्य मद्य मग काही निम्म्या किमतीत व नंतर पूर्ण किमतीत अशी त्याची रचना होती. मुलींना अर्थातच सवलत अधिक होती. ज्या पालकांनी ही माहिती पोलीस व प्रसारमाध्यमांना कळविली त्यांनी त्यांचे म्हणणे असे की, गेल्या पंधरा दिवसापासून या पार्टीची तयारी सुरु होती. सोशल नेटवर्क आणि मोबाईल मेसेज यातूनच त्याची जाहिरात करण्यात आली होती. या पार्टीसाठी मुले येवढी वेडी झाली होती की, ज्या मुलांना पालकांनी परावृत्त केले त्यांनी हट्ट धरण्यासाठी घरातील लॅपटॉप व अन्य किमती सामान फोडले. पुणे कॅन्टोन्मेट, मुंढवा नगर रोड, मगरपट्टा सिटी ह्या या भागातील श्रीमंत वसाहती असल्याने मुलांनी परस्परांना सांगून तेथे प्रवेश मिळवला. त्या रिसॉर्टमध्ये प्रवेश निश्चत केला.

याबाबत माहिती सांगताना पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे म्हणाले, ‘सकाळी अकरा वाजता ही पार्टी सुरु झाली पलिसांनाही येथे अधिकाधिक शंभर सव्वाशे मुले असतील असे वाटले. पण प्रत्यक्षातील गर्दी बघून आम्हीही चक्रावून गेलो. आम्ही त्वरीत जादा कुमक मागविली. फ्रेशर पार्टीच्या नावाखाली ११वीला प्रवेश घेतलेल्या मुलांबरोबरच ९वी आणि १०वी ची अल्पवयीन मुल-मुलीं असणे आम्हालाही अनपेक्षित होते. कारण त्यांना अटक करणेही शक्य नसते.
 
मुंढव्यातील रिव्हर व्ह्यू रिसॉर्टमधील डीजेच्या तालावर दारु पिऊन तब्बल ७७५ ते ८००  अल्पवयीने मुले-मुली धिंगाणा घालत होती. अक्षरशः त्यांना स्वतःचा तोलही आवरता येत नव्हता, तर कुणाला शुद्ध नव्हती. विशेष म्हणजे मुलींची संख्या अधिक आहे. सर्व उच्चभ्रू आणि श्रीमंत वर्गातील मुलांचा यामध्ये समावेश असल्याने सदर प्रकार उघडकीस यायला दोन दिवस लागले.

या प्रकरणी पोलिसांनी या पार्टीचा आयोजक दर्शिल भरत चव्हाण (२०, शनिवार पेठ), आशिष विवेक लिमये (१९,कर्वेनगर)या दोघांना अटक केली होती.  त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रत्येकी बाराशे रुपये दंड भरून सुटका करण्यात आली. सार्वजनिक जागी सिगारेट फुंकणार्‍या सहा मुला मुलींना ७०० रूपये दंड ठोठावला आहे. इतर तीन आयोजकांचा शोध चालू आहे.  याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल आणि पार्टी आयोजकावर खटले दाखल केले आहे. विशेष म्हणजे या पार्टीचे आयोजन फेसबुक आणि ब्लॅकबेरी मेसेंजरच्या माध्यमातून करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,  यातील ८० टक्के मुले-मुली १० वी ११वी इयत्तांमधली अर्थात १८ वर्षे वयाच्या आतील असल्याने पोलिसी कारवाई करण्याला मर्यादा येत होत्या. पोलिसांनी २० ते २२ वयाच्या मुलांना ताब्यात घेतले. जे शुध्दीत होते त्यांना घरी पाठवण्यात आले. आयोजकाने मुलींना मोफत प्रवेश ठेवला होता; ही पार्टी अन्य वयोगटाच्या पाटर्या नसतात तेंव्हा केली असल्याने त्याला  हॅपी आवर्स असे नाव देऊन  दारू अर्ध्या किमतीला देण्यात येत होती. विशेष म्हणजे मुलं मद्यप्राशनासह नशेखोरीच्या आहारी गेली होती.

शनिवारी दुपारी या पंचतारांकीत हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला असतानाही दुसर्‍या दिवशी रविवारी याच हॉटेलात दारूपार्टी दणक्यात झाली. यामध्ये  अनेक युवक युवती सहभागी झाले होते. मात्र, याबाबत पोलिस यंत्रणेला थांगपत्ताही लागला नाही.
   
फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली शालेय विद्यार्थ्यांना व्यसनाधिनतेकडे आकर्षित करण्याच्या प्रकाराबाबत शहरातील काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालये जागृत झाली आहेत. शहरातील काही शाळांनी पालकांची बैठक तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.  व्यसनाधीनतेचे घातक परिणाम व गांभीर्य विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी समुपदेशन तसेच पालकांनाही जनजागृती उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनीही आता सोशल नेटवकींर्ग साईट्सवर वॉच ठेवण्यासोबतच शाळांमध्ये जागृती करण्याचं ठरवलं आहे.

मुंढव्यातील  रिव्हर व्ह्यू हॉटेलमधील पार्टीबरोबरच याच दिवशी कोरेगाव पार्क भागातील एका मोठ्या हॉटेलमध्ये दुपारी चार वाजता अशीच रेव्ह सदृष्य पार्टी रंगली होती. यावरही पोलिसांनी छापा टाकला. ‘ब्लॅडर पार्टी’ असे या पार्टीचे नाव होते. यामध्ये बिअर, वाईन, थंड पेये ठेवलेली असतात. चारशे ते पाचशे रुपये भरल्यानंतर या पार्टीत प्रवेश मिळतो. बड्या मंडळींच्या मुलांसाठी ही रक्कम अगदी नगण्य असते.

Leave a Comment