प्राचीन मूर्ती खरेदीप्रकरणी चौकशी

ऑस्ट्रेलियातील नॅशनल आर्ट गॅलरीने भारतीय अमेरिकन डिलर सुभाष कपूर याच्याकडून खरेदी केलेली नटराजाची पुरातन मूर्ती चोरीची आहे का याची चौकशी सुरू करण्यात आली असून कपूर सध्या तमीळनाडूच्या तुरूंगात पुरातन मूर्ती चोरी प्रकरणी अटकेत आहे. ६३ वर्षीय कपूरने नॅशनल आर्ट गॅलरीला विकलेली ही मूर्ती ११ व्या किवा १२ व्या शतकातील असून अतिशय दुर्मिळ आहे असे समजते.२००८ साली या संग्रहालयाने ही मूर्ती खरेदी केली आहे.

ब्रांझ धातूची सुमारे १३० सेंमी उंचीची ही नटराज मूर्ती खरेदी करण्याअगोदर सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करूनच खरेदी केली असल्याचे नॅशनल आर्ट गॅलरीचे संचालक रॉन रॅडफोर्ड यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियातील हे संग्रहालय जगातील नामवंत १८ संग्रहालयांपैकी एक आहे. मात्र कपूरने विकलेली मूर्ती तस्करी करून आणली गेली असल्याचे समजताच संग्रहालयातील अधिकार्‍यांनी भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांची या महिन्यात भेट घेतली. मात्र भारतातील पोलिसांचे नक्की काय म्हणणे आहे याची माहिती मिळू शकली नाही असे सांगून रॅडफोर्ड म्हणाले आम्हाला ही मूर्ती खरेदी करण्यापूर्वी जी कागदपत्रे दाखविली गेली त्याची पुर्नतपासणी कलातज्ञांकडून केली जाणार आहे. युनेस्कोने याबाबत घालून दिलेल्या आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करूनच संग्रहालयासाठी खरेदी केली जाते असेही ते म्हणाले.

सुभाष कपूरला गेल्या आक्टोबरमध्ये जर्मनीत तस्करीच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून त्याने तमीळनाडू आणि केरळातील अनेक मंदिरातून पुरातन दुर्मिळ मूर्ती चोरून त्यांची तस्करी करून विकल्याचा त्याच्यावर भारतात आरोप आहे. त्यामुळे जर्मनीकडून त्याचे भारतात हस्तांतरण करण्यात आले आहे.

Leave a Comment