भ्रष्टाचाराची लढाई एकाकीही लढू: स्वराज

नवी दिल्ली: भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी पुकारलेल्या लढाईत भारतीय जनता पक्ष एकाकी पडला तरी त्याची फिकीर न करता ही लढाई सुरूच राहील; असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केला.

कोळसा खाण घोटाळ्याबाबत पंतप्रधानांनी संसदेत निवेदन केल्यानंतर पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटलीही उपस्थित होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा; या मागणीवर भाजप ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. कोळसा खाण वाटप रद्द करून नव्याने लिलाव करण्यात यावा; अशी मागणीही त्यांनी केली.

पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेचे कामकाज बंद पाडण्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महत्वाचे घटक असलेल्या जनता दल (यु) आणि अकाली दलाचा विरोध असल्याकडे स्वराज यांचे लक्ष वेधले असता; जनता दलाने सोमवारी लोकसभेत पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी असल्याचे अध्यक्षांना सांगितले आहे; असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमचाही या मागणीला पाठींबा असल्याचा दावा त्यांनी केला.

पंतप्रधानांनी सुरुवातीला खाण वाटपाची संपूर्ण जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. पुढच्या निवेदनात त्यांनी देशातील संघ राज्य पद्धती, संसदीय पद्धती, विधी मंत्रालय आणि कॅगवर खापर फोडल्याची टीका जेटली यांनी केली. जर आपण कॅगला बदलू शकत नाही तर त्याला अपमानित करून खच्ची करा; ही काँग्रेसची रीतच असल्याची टीकाही जेटली यांनी केली.