जयपूर- गुलाबी छटा लेवून नटलेले शहर

राजस्थानची राजधानी असलेले जयपूर शहर म्हणजे गुलाबी रंगांच्या विविध छटा घेऊन नटलेले शहर. विद्याधर भट्टाचार्य या वास्तूशिल्पकाराने या शहराची आखणी केली. महाराज सवाई जयसिंग दुसरे यांनी १७२७ साली वसविलेले हे शहर रूंद सरळ रस्ते, हमरस्ते, गल्ल्या, बाजार आळी अशा नऊ आयताकृती सेक्टर्समध्ये वसले आहे. हिंदू स्थापत्यकला प्रबंध तत्त्वांवर या शहराचे आरेखन केले गेले आहे.

सुंदर राजमहाल, पर्वतमाथ्यांवरचे मजबूत किल्ले, शहराभोवती असलेला भिंतीचा वेढा अशा परंपरा आणि आधुनिकतेचा संगम या शहरात पाहायला मिळतो. आकर्षक बागा, उद्याने, रंगीबेरंगी बाजार, राजस्थानी हातमाग कपडे, दागिने आणि हेरिटेज हॉटेल्स नजर खिळवून ठेवतात. पूर्वी राजांच्या महालांचेच हेरिटेज हॉटेल्समध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
Jaipur1
सिटी पॅलेस हे येथल्या अनेक आकर्षणातील एक. जुन्या शहराच्या मध्यभागी असलेला हा राजवाडा राजस्थानी आणि मुघल शैलीचा उत्तम नमुना आहे. भुर्‍या पांढर्‍या संगमरवरी स्तंभावर असलेल्या कोरीव कमानी, सोनेरी रंगीत खड्यांच्या फुलांच्या नक्षीकामाने सजविलेल्या आहेत. दि पॅलेस येथील संग्रहालयात आहेत राजांचे पेहराव, मुगल व रजपूत राजांची शस्त्रास्त्रे, तलवारी, रत्नजडीत सुंदर म्याने, कलादालनात आहेत पेंटिग्ज, गालिचे, राजांच्या वापरातल्या वस्तू, आणि खगोलशास्त्रावरील अतिशय दुर्मिळ असे अरबी, पर्शियन, लॅटीन व संस्कृत भाषेतील ग्रंथ. राणा जयसिंग याने या शहरात उभारलेल्या पाच वेधशाळेंपैकी जंतरमंतर ही सर्वात मोठी दगडी वेधशाळा आणि तेथील रामयंत्र वेधक आहे. उंची मोजण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जात असे.
jaipur-amer-fort
१७९९ साली उभारला गेलेला जुन्या शहराच्या मुख्य रस्त्यावरच असलेला विंड पॅलेस अथवा हवामहल हे येथील आणखी एक आकर्षण. पाच मजली ही गुलाबी रंगाच्या दगडात बांधली गेलेली वास्तू जाळीच्या वाळूच्या खिडक्यांनी अधिक सुंदर बनली आहे. राजघराण्यातील स्त्रियांना शहरातील चहलपहल, मिरवणुका पाहता याव्यात म्हणून ही वास्तू बांधली गेल्याचे सांगतात. बिन मनोर्‍याचे कृष्ण मंदिर म्हणजे गोविंद देवजी मंदिर पाहायला हवे कारण ही रजपूतांची कुलदेवता आहे. अल्बर्ट हॉल येथील संग्रहालय आणि दुष्काळात लोकांना रोजगार मिळावा म्हणून  सवाई रामसिंग दुसरा याने १८६८ साली बांधलेली बाग सुंदर आहे. हॉलमध्ये मूर्ती, पेंटिग्ज, सजावटीच्या वस्तू, इजिप्तच्या ममी, पर्शियन गालिचे पाहायला मिळतात व खुल्या नाट्यगृहात कार्यक्रम होतात.
Jaipur-City-Palace
अनेक देशातील विविध आकाराच्या. प्रकाराच्या बाहुल्यांचे डॉल म्युझियम, बिर्ला तारामंडळ, चुलगिरी मंदिर, टेकडीच्या माथ्यावर स्कॉटीश पद्धतीने बांधला गेलेला मोती डुंगरी किल्ला, त्याच्या पायथ्याशी असलेले गणेश मंदिर आणि नुकतेच बांधलेले संगमरवरी, अतिशय सुंदर असे लक्ष्मीनारायण मंदिर प्रेक्षणीय आहे. १८ व १९ व्या शतकांत बांधलेल्या बागा उद्याने असलेली घाट की गुनी ही पहावी.
Jaipur-Doll-Museum2
जयपूरला जाऊन पाहायलाच हवा तो आमेर राजवाडा. राजा मानसिग, मिर्झा राजा जयसिंग आणि सवाई जयसिंग अशा तीन पिढ्यांनी दोन शतके हे बांधकाम केले असे सांगतात. मावठा सरोवरातील शांत पाणी, राजवाडा पाहण्यासाठी कठीण चढाचा रस्ता चढावा लागतो. हत्तीवरूनही येथे जाता येते. येथेच असलेली राजघराण्याची कुलदेवता प्राणप्रतिष्ठा करून तिची स्थापना करण्यात आली आहे आणि हजारो भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. उद्यान राजवाडा आरसे, जडाव काम महाराणी छत्री, राजांची स्मारके, जलमहाल येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.
jaipur-Jain-temples
जयपूरपासून १२ किमीवर असलेल्या सांगानेर येथे आहेत सुंदर कोरीव कामाची जैन मंदिरे, राजवाड्याचे अवशेष, तिहेरी प्रवेशद्वार. शिल्प व उद्योगाचे हे महत्त्वाचे केंद्र असून येथील स्क्रिन प्रिटींगचे उत्तम कापड देश परदेशात अतिशय प्रसिद्ध आहे. सांगानेर प्रिंट अशीच त्याची ओळख आहे. जयपूरला खरेदीचीही अनेक ठिकाणे आहेत. कुंदन काम केलेले दागिने, रत्ने, कृत्रिम खडे, मीनाकारी केलेले दागिने, कापड, कोटा साड्या, ब्ल्यू पॉटरी, मीनाकामाची भांडी, पितळेच्या आकर्षक वस्तू, गालिचे, रजया, चपला यांनी जोहरी बाजार, बापू बाजार, चौपार स्टॉल अगदी भरून वाहत आहेत.
jaipurj–festival
जयपूरमध्ये दरवर्षी साजरा होणारा गणगौर, हत्ती उत्सव, तीज हे पाहण्यासारखे सण आहेत. मार्च ते ऑगस्ट या काळात ते साजरे होतात. शाकाहारी, मांसाहारी जेवणाची चांगली सोय आहे तसेच राहण्यासाठी खिशाला परवडतील अशी अनेक हॉटेल्स आहेत. हेरिटेज हॉटेल्स दुरून पाहायलाच चांगली. कारण तेथे राहण्याचा खर्च एकूण ट्रीपच्या खर्चापेक्षा पाचपट आहे. राजस्थान टूरिझमच्या जयपूर दर्शन बसेस आहेतच. विमानतळ असल्याने विमानाने जाता येते तसेच रस्ते आणि रेल्वेही सोयीच्या आहेत.

 

Leave a Comment