सोन्याची चकाकी

काल सोन्याच्या बाजारामध्ये सोन्याने नवा विक्रम प्रस्थापित केला. दहा ग्रॅमला ३१ हजार ११५ रुपये असा मुंबईच्या बाजारातला भाव होता. भारतामध्ये साधारणतः लग्नसराई जवळ आली की, सोन्याचे भाव कडाडतात असा अनुभव आहे. परंतु सोन्यामधल्या या तेजीचे एक वैशिष्ट्य असे की, एकदा चढलेला भाव साधारणतः घसरत नाही. प्रसंगपरत्वे त्यात थोडीबहुत मंदी येईल, परंतु पुन्हा हंगाम आला की ते भाव वाढायला लागतात पुन्हा कधीच कमी न होण्यासाठी. म्हणूनच सोन्याकडे सगळे लोक गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून पहात असतात आणि सोन्याचे भाव जसजसे वाढत जातात तस तसा लोकांच्या मनात असा भाव निर्माण होतो की, ज्याअर्थी सोन्याचे भाव वेगाने वाढत आहेत त्या अर्थी सोन्यातली गुंतवणूक फायदेशीरच आहे. म्हणून लोक सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करायला लागतात. ती वाढत चालली की, सोन्याची मागणी वाढते. परंतु वाढत्या मागणीप्रमाणे सोने उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे आणखी भाव वाढायला लागतात. एकंदरीत सोन्याचे भाव वाढतात म्हणून मागणी वाढते आणि मागणी वाढली म्हणून भाव वाढतात.

अशा प्रकारे सोन्यामधली तेजी ही भावनिक असते. तिच्यापासून कसलाच व्यावहारिक फायदा होत नाही. ती केवळ काल्पनिक गुंतवणूक असते. अर्थशास्त्राच्या भाषेत तिला सेन्स ऑफ बिअरिंग असे म्हणतात. अशा प्रकारची गुंतवणूक भारतात फार मोठ्या प्रमाणावर होते आणि भारतातील लोकांकडे वयक्तिक सोने सर्वात जास्त आहे. जगामध्ये सरकारांकडे सोने जास्त आहे, परंतु भारतात वयक्तिक सोने जास्त आहे. त्याचा देशाच्या प्रगतीसाठी कसलाच उपयोग होत नाही. म्हणून सरकारने सोन्याच्या व्यवहारावर बंधने आणण्याचा प्रयत्न केला होता. सोने आयात करण्यावर कर लावला होता आणि दागिन्यावर लावलेला अबकारी कर वाढवला होता. परंतु त्यामुळे बराच आरडाओरडा झाला, शेवटी सरकारने हे कर हटवले. मात्र अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार अजून सुद्धा सोन्याला लक्ष्य करण्याच्या विचारात आहे. असे असले तरीही भारतीय लोक एवढे सुवर्णवेडे आहेत की, कराची तलवार टांगलेली असतानाही सोन्याच्या खरेदीत काहीही फरक पडलेला नाही. भारत देशावर दुष्काळाचे सावट असले तरीही सोन्याची खरेदी आणि विक्री धुमधडाक्याने सुरू आहे.

गेल्या आठवड्यात तर सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली, परंतु चालू आठवड्यात तिने मोठी झेप घेऊन ३१ हजाराची पातळी ओलांडली आहे. पण एवढे असूनही सोन्याच्या खरेदीतला उत्साह टिकून आहे आणि या व्यापारात मोठी उलाढालही सुरू आहे. सोन्याच्या व्यापाराबरोबरच हिर्‍यांच्या आणि दागिन्यांच्या व्यापारातही अशीच अवस्था आहे. आता आपल्या देशात वर्षाला ९३३ टन सोन्याची मागणी आहे. ती २०२० सालपर्यंत १२०० टनांपर्यंत जाण्याची शक्यता व्यत्त* केली जात आहे. तसे झाल्यास भारत हे जगातले हिरे आणि दागिने यांच्या व्यापाराचे हब होंईल. सध्या आपण जगाच्या अन्य भागातून सोने मागवतो आणि त्यावर आपला १०० अब्ज डॉलर्स एवढा खर्च होतो. यावर अनेकांचा डोळा होता आणि आपले परदेशी चलन एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्यासारख्या वस्तूवर खर्च व्हायला नको असे त्यांना वाटते. असा खर्च कमी व्हावा म्हणून सोन्यावर कर लावला गेला होता आणि काही कर वाढवला गेला होता. या करवाढीचा खरेदीवर कसलाही परिणाम झाला नाही आणि आयातीवरही काही खर्च कमी झाला नाही. गेल्या दोन महिन्यांतली सोन्याची आयात यथास्थित जारी राहिली. सोन्याला सार्‍या जगात किमत आहे. ते एक प्रकारचे परदेशी चलनच आहे. गेल्या तीन वर्षात सोन्याच्या किमतीत १२० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यातली गुंतवणूक ही सर्वात चांगली गुंतवणूक मानली जाते.

भारतात सरकारपेक्षा खाजगी सोने जास्त आहे. त्याची एकंदरित किमत १ हजार अब्ज डॉलर्स एवढी होते. हे सोने वजनात १८ हजार टन भरते. देशातला सोन्याचा आणि दागिन्यांचा दर वर्षाचा व्यापार ३ लाख कोटी रुपये एवढा आहे. जगाची अस्थिर अर्थव्यवस्था पाहिल्यावर हा व्यापार वाढेल आणि सोन्याची किमतही वाढेल असे या क्षेत्रातल्या तज्ञना वाटत आहे. म्हणून सोन्याची मागणी सतत वाढती आहे. सोन्याचे भाव दररोज बदलतात. ते सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतात. सोन्याची मागणीही रोज बदलते आणि त्या प्रमाणात पुरवट्याची स्थितीही बदलते म्हणून भावही बदलतात. सोने हे एक गुंतवणुकीचे साधन असल्यामुळे अर्थव्यवस्थेत होणार्‍या बदलांच्या अनुषंगानेही सोन्याचे भाव बदलत असतात. शेअर बाजार,जागांच्या किमती आणि व्याजाचे दर यांची स्थिती काय आहे यावरही सोन्याचे दर ठरतात. सोने वगळता अन्य तीन गुंतवणूक साधनांत काही चढउतार झाले की सोन्याचे भाव त्या प्रमाणात बदलत असतात. जमिनीचे भाव वाढले की लोक सोन्यात पैसे गुंतवायला लागतात आणि सोन्याची मागणी वाढून सोने महाग होते.