पाकिस्तानातील २६/११ खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

इस्लामाबाद: मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पाकिस्तानी न्यायालयात सुरू असलेली सुनावणी एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली. या खटल्यातील मुख्य आरोपी झकीउर्र रेहमान लखावीचे वकील ख्वाजा हरीस अहमद यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला.

पाकिस्तानातील रावळपिंडी दहशतवाद विरोधी विशेष न्यायालयात लखावी याच्यासह सात जणांविरोधात २६/११ चा खटला चालविला जात आहे. वकिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्याचा आरोपींचा अर्ज न्यायालयाने तत्काळ मान्य केला.

या आरोपींविरुद्ध कट रचणे, त्याची अंमलबजावणी करणे, कटासाठी निधी पुरविणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

यापूर्वीदेखील खराब हवामानामुळे आरोपीच्या वकिलांना पोहोचणे शक्य होत नसल्याच्या कारणासाठी सुनावणी ३ आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.

Leave a Comment