कमवा आणि शिका एम.बी.ए. (रिटेल)

भारतामध्येच नव्हे तर सार्‍या जगातच किरकोळ विक्रीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड विकास होत आहे. आपल्या देशात या क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला संधी द्यावी की नाही, यावरून वाद जारी आहे. परंतु तरी सुद्धा भारतातील रिटेल विक्रीच्या क्षेत्राची वाढ २८ टक्के एवढी आहे. २०१६ सालपर्यंत भारतातील या क्षेत्रातील उलाढाल २०० अब्ज डॉलर्स एवढी असेल.

त्यामुळे आंतरराष्ट्रिय बाजारातील वस्तूंची उपलब्धता भारतात होईल आणि भारतातील अनेक उत्पादनांना परदेशी व्यापारपेठ मिळेल. या तेजीमुळे या क्षेत्रात व्यवस्थापकीय पदांसाठी सुशिक्षित तरुणांची मोठी गरज जाणवत आहे. असे असले तरी केवळ रिटेल व्यवस्थापनाचे स्वतंत्र अभ्यासक्रम म्हणावे तेवढे उपलब्ध नाही. आहेत त्याच एम.बी.ए. च्या अभ्यासक्रमात शेवटच्या वर्षाला रिटेल या विषयाचे स्पेशलायझेन केले जाते.

रिटेल व्यवस्थापनामुळे सप्लाय चेन, व्ह्युजिअल मर्कंटाईज, स्पेस मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्सेस, ऑन लाईन मार्केटिंग , सेल्समनशीप अशा अनेक क्षेत्रांना उजाळा मिळाला आहे आणि या सर्व अनुषंगिक विषयांचा अंतर्भाव करून बंगळूर येथील जेम्स बी स्कूल या संस्थेने केवळ रिटेल मॅनेजमेंटचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी या संस्थेने रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेची मदत घेतली आहे.

ही संघटना रिटेल व्यवस्थापनात गुंतलेल्या उद्योजकांची आहे. तिचे सहाय्य घेण्यामागे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभव येण्यासाठी शिकत असतानाच काम करण्याची संधी मिळावी हा हेतू आहे. जेम्स बी स्कूलने या सहकार्याचे स्वरूप आणखी वाढवून कमवा आणि शिका अशी योजना सुरू केली आहे. या एम.बी.ए. च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याला रिटेलर्स असोसिएशनच्या सदस्यांच्या मॉलमध्ये थेट नोकरी दिली जाते. ही नोकरी म्हणजे नोकरीच आहे.

विद्यावेतन देऊन केलेले ते प्रॅक्टिकल वर्क नाही. म्हणजे विद्यार्थी स्वतः नोकरीही करत असतो आणि नोकरी करता करता त्या नोकरीतील अनुभवाची थिअरीसुद्धा शिकत असतो. दोन वर्षांच्या शिक्षणानंतर त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजूर केलेली एम.बी.ए.ची पदवी मिळते आणि त्याच्या समोर चांगल्या नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. नोकरी करत करत शिक्षण घेण्याचा एम.बी.ए. अभ्यासक्रमाचा हा भारतातला पहिलाच प्रयोग आहे.

या संस्थेने आणखी एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्यानुसार एखाद्या पदवीधराला स्वतःचे रिटेल स्टोअर्स सुरू करण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही संस्था मदत आणि सहकार्य करते. सध्या कोणत्याही रिटेल स्टोअर्समध्ये नोकरी करत असलेल्या पदवीधर कर्मचार्‍यांनाही हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाला पदवी प्राप्त करणार्‍यांनाच प्रवेश दिला जातो. परंतु पदवी न मिळवलेले अनेक तरुण रिटेल क्षेत्रात येऊ इच्छित आहेत. त्यांच्यासाठी या संस्थेने एक वेगळी सोय केलेली आहे. अशा विद्यार्थ्यां-साठी बारावीनंतरचा तीन वर्षांचा रिटेलचा पदविका अभ्यासक्रम सुरू केलेला आहे.

या अभ्यासक्रमास सुद्धा रिटेलर्स असोसिएशनची मदत मिळालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हाही अभ्यासक्रम कमवा आणि शिका उपक्रमांतर्गत पूर्ण करता येतो. अधिक माहितीसाठी संफ – जेम्स बी स्कूल, मैसूर महाराजा इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन, रॉयल कॉटेज, बंगळूर पॅलेस, वसंत नगर, बंगळूर ५६० ०५२. फोन ०९९८०२८८८६९/०९८८०९

Leave a Comment