क्युरॅसिटीचे यश

मानवी बुद्धी हा या विश्वातला चमत्कार आहे. म्हणूनच मंगळावर हा मानव अवकाशयान पाठवत आहे आणि ते अवकाशयान सोबत घेऊन जात असलेली साधने तिथल्या स्थितीची माहिती पृथ्वीवर बरोबर पाठवत आहेत.  अन्य कोणत्याही ग्रहावर विशेषत: चंद्रावर अवकाशयान पाठवणे सोपे आहे कारण पृथ्वी आणि चंद्र यांच्यातले अंतर ठरलेले आहे पण मंगळ हा ग्रह आपल्यापासून किती  कोटी मैलावर आहे हे नेमकेपणाने सांगता येत नाही. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर दर सेकंदाला बदलत असते. अशा या विचित्र ग्रहावर अंतराळयान पाठवायचे  ही काही सोपी गोष्ट नाही. ते अवकाशयान आणि त्यासोबत पाठवलेल्या क्युरॅसिटी या रोव्हर पद्धतीच्या वाहनाने तसेच त्यावरच्या सर्व  साधनांनी आपली कामे ठरल्याप्रमाणे सुरू केली असून मंगळाच्या स्थितीची छायाचित्रे पाठवायला सुरूवात केली आहे.

क्युरॅसिटी हा या मोहिमेतला मैलाचा दगड ठरणार आहे पण यापूर्वी मंगळावर काही संशोधन झाले आहे.  यापूर्वी म्हणजे  आठ वर्षांपूर्वी रशियाने मंगळाच्या फोबोस या चंद्रावर फोबोस ग्रंट हा उपग्रह सोडला होता.  त्याने फोबोस चंद्रावर मानवी वस्ती करण्यास अनुकूल वातावरण असेल असे संकेत देणारे संदेश सुद्धा पाठवले. नंतर तो लुप्त झाला. मात्र त्याने दिलेली माहिती मंगळावरची नसून मंगळाच्या चंद्राची होती आणि ती मंगळावर प्रकाश टाकण्यास उपयुक्त ठरली आहे. त्यानंतर अमेरिकेने मंगळावर ऍपॉर्च्युनिटी आणि स्पिरीट ही दोन रोव्हर प्रकारची साधने पाठवली होती. यातल्या ऍपॉर्च्युनिटीने मंगळावर जिप्समचे साठे असल्याचा शोध लावला आहे. हे जिप्सम पाण्यामुळेच निर्माण होते. ते मंगळावर बर्याच काळापासून (म्हणजे काही दशलक्ष वर्षांपासून ) साठवले गेले असावे असा तर्क आहे. २००४ सालच्या जानेवारीमध्ये ही दोन साधने मंगळाच्या आपल्याला पृथ्वीवरून न दिसणार्या बाजूला उतरली आहेत. तिथले काही नमुने जमा करून त्यांचे विश्लेषण करण्याची व्यवस्था या दोन साधनात आहे पण स्पिरीट  हे साधन गेल्या काही दिवसांपासून निकामी झाले आहे. शास्त्रज्ञांनी त्याला अनेक संदेश पाठवले पण त्याच्याकडून काही उत्तर आले नाही. आता त्याचे आयुष्य संपले आहे अशा निष्कर्षाप्रत यावे लागले आहे. ऍपॉर्च्युनिटीने मात्र  मंगळाच्या संबंधात असलेल्या गूढतेचे वलय बरेचसे दूर करण्यास सुरुवात केलेली आहे. मंगळ हा ग्रह आज थंड आणि कोरडा असला तरी तो पूर्वी तसा नव्हता, असे या उपग्रहाने पाठवलेल्या संदेशावरून दिसून येत आहे. तिथे सापडलेले जिप्सम मंगळाच्या स्वरूपावर प्रकाश टाकणारा मोठाच पुरावा ठरला आहे. ज्याअर्थी ही वस्तू तिथे सापडली आहे त्याअर्थी तिथे पाणी आहे असा शास्त्रज्ञांचा तर्क आहे. कारण काही विशिष्ट प्रकारच्या खडकाच्या फटीत पाणी साचून राहते. आणि त्यातील काही रासायनिक घटकांचा साका तयार होऊन जिप्समची निर्मिती होत असते. मुळात या खडकांना फटी पडल्या हीही बाब तिथे कधी काळी भूकंप झाला असला पाहिजे हे सूचित करणारी आहे. भूकंपामुळे खडकांना फटी पडल्या आणि त्यात पाणी साचून जिप्सम तयार झाले.

अर्थात या सार्या प्रक्रिया काही लाख वर्षापूर्वी घडलेल्या आहेत. मंगळावर मिथेन वायू सुद्धा सापडलेला आहे. हा वायू साधारणत: प्राण्याच्या उच्छ्वासातून बाहेर पडत असतो. म्हणूनच ज्या अर्थी तिथे मिथेन आहे त्याअर्थी तिथे कधी तरी जनावरांचे वास्तव्य असले पाहिजे आणि ही जनावरे तिथल्या पाण्यावर जगत आली असली पाहिजेत. आता कालपासून मंगळावर नासाची नवी मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत तिथे पाठवण्यात आलेले क्यूरॅसिटी हे अत्यधुनिक साधन सौर ऊर्जेवर चालते. ते केवळ साधन नाही तर ती एक प्रयोगशाळा आहे.तिच्यात इतकी साधने आहेत की त्यांमुळे मंगळाच्या स्वरूपावर मोठा प्रकाश पडणार आहे. या साधनांत यांत्रिकी कुदळ आहे. तिच्या साह्याने मंगळावरचा खडक खोदून काढता येणार आहे. आजवर चंद्रावर पाठवण्यात आलेल्या उपग्रहांनी आणि साधनांनी तिथले खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले आहेत आणि पृथ्वीवर त्यांचे विश्लेषण करून त्यातून काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. पण आता क्युरॅसिटी वर अशी काही साधने आहेत की ती या खडकांचे विश्लेषण तिथेच करतील आणि त्याचे निष्कर्ष खाली पाठवतील.  

मिथेन वायुच्या बाबतीतही असेच होणार आहे. मिथेन वायूचे नमुने क्युरॅसिटीत जमा होतील. तिथेच या वायूचे विश्लेषण होईल आणि  त्याचे निष्कर्ष पृथ्वीवर संदेशांच्या रूपाने पाठवले जातील. क्युरॅसिटी या शिवाय मंगळावरच्या अनेक नव्या गोष्टींचा छडा लावणार आहे. त्याच्यावर काही कॅमेरे बसवलेले आहेत. हे कॅमेरे  रसायनांवर चालणारे असतील. म्हणून त्यांना केमकॅम असे नाव देण्यात आले आहे. हा कॅमेरा मंगळाच्या पृष्ठभागावरील  घटनांची अतिसूक्ष्म छायाचित्रे काढून ती पृथ्वीवर पाठवू शकेल. त्याला एक टेलिस्कोप जोडलेला आहे. तो या केमकॅमकडून बरेच काम करून घेऊ शकेल. १९७६ पासून मंगळावर अनेक मोहिमा काढण्यात आल्या पण क्युरॅसिटी  ही त्यातली सर्वात आधुनिक आणि व्यापक मोहीम आहे. तिला मंगळावर पाठवलेली स्पेसलॅबच म्हटले जात आहे.