सोशल मिडीयावर सेन्सॉरशिप लादणार नाही: शिंदे

नवी दिल्ली: शासनाने केवळ प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह मजकूर असलेल्या साईट्स आणि वेब अकाऊण्ट्स बंद करण्याचे आदेश दिले असून सेन्सॉरशिप लादून वेब स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही; असे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

सरकारने काही व्यक्ती, संस्थांची वेब अकाऊण्ट्स बंद करण्याचे आदेश संबंधित वेब साईट्सना दिले आहेत. यामध्ये काही पत्रकारांच्या अकाऊण्ट्सचा समावेश असल्याने ही सेन्सॉरशिप आहे काय; असा सवाल पत्रकारांनी केला.

देशातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे सरकारचे प्रयत्न असून ज्यांनी वेब माध्यमाचा गैरवापर केला आहे; त्यांनाच त्रास होऊ शकतो. सरळ मार्गाने इंटरनेट वापरणार्‍यांना सरकारच्या कडक धोरणापासून कोणताही त्रास संभवत नाही; असे शिंदे यांनी स्पष्ट केले.