
आज कोणत्याही देशाचा व्यापार हा केवळ देशांतर्गत व्यापार राहिलेला नाही. सर्वच देशातल्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय आयाम प्राप्त झालेला आहे. त्यामुळे व्यापारविषयक अभ्यासक्रमांमध्ये परदेशांशी केला जाणारा व्यापार महत्वाचा ठरायला लागला आहे. तसा तो ठरला, की त्यासंबंधीचे अभ्यासक्रमसुद्धा तयार व्हायला लागतात. कारण फॉरेन ट्रेड म्हणजेच परदेशांशी व्यापार करायचा असेल तर त्या-त्या देशातील लोकांच्या गरजा, त्या गरजा आपण कशा पूर्ण करू शकतो, त्यांच्या किंमती काय असतील याचा सविस्तर अभ्यास करावा लागतो. त्या देशातील भाषा किंवा ती समजणारे दुभाषे मिळवावे लागतात. त्या देशातल्या चलनाचा आणि आपल्या चलनाचा संबंध कसा आहे, त्या चलनाचा डॉलरशी विनिमय दर काय आहे, अशा सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तिकडे माल पाठवायचा ठरलाच तर पाठविण्याच्या सोयी म्हणजे वाहतुकीच्या सोयी काय आहेत हेही समजून घ्यावे लागते. हे सगळे समजून घेतल्यानंतर म्हणजेच फॉरेन ट्रेड विषयक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी उत्तम उपलब्ध होऊ शकते.
