न्यूझीलंडवर मात करून भारत फायनलमध्ये

सलामीवीर प्रशांत चोप्रा व बाबा अपराजित यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रोमहर्षक लढतीत १९ वर्षाखालील भारतीय संघाने न्यूजीलंडवर ९ धावाने मात केली. भारतीय संघ या विजयामुळे फायनलमध्ये पोहचला असून फायनलमध्ये भारताची गाठ आता ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे.

सेमीफायनल मध्ये भारताची सुरुवात चांगली झाली. प्रशांत चोप्रा व कर्णधार उन्मुक्त सिंग या ओपनरने भारताचे अर्धशतक झळकाविले. उन्मुक्त सिंग हा ३१ धावा कडून बाद झाला. त्यानंतर बाबा अपराजित व चोप्रा यांनी न्यूझीलंड संघाची गोलंदाजी फोडून काढली. चोप्राने ५२ तर अपराजीतने ४४ धावा केल्या. या दोघाच्या दमदार खेळींमुळे भारतीय संघाने ५० ओवरमध्ये ९ गडी बाद २०९ धावा केल्या.

२१० धावाचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूजीलंड संघाची सुरुवात निराशाजनकच झाली. डेविडसन केवळ सहा धावा काढून बाद झाला. त्याला रविकांतने बाद केले. त्यानंतर किवी संघाचे एका पाठोपाठ एक गडी बाद होत गेल्याने त्यांची अवस्था चार गडी बाद ६३ अशी झाली होती. भारताकडून हरमीत सिंगने दोन गडी बाद केले. शेवटच्या ५ षटकात ४८ धावा करायच्या होत्या. मात्र किवी संघाला हे आव्हान पेलले नाही. त्यांनी ५० षटकात २०० धावा केल्याने त्यांचा ९ धावाने पराभव झाला.

भारताचा संघ फायनलमध्ये पोहचला असून रविवारी त्याची लढत आता ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.

Leave a Comment