भाजप खासदार राजीनामा देणार असल्याची अफवा

नवी दिल्ली: पंतप्रधानांवर दबाव वाढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार राजीनामा देणार असल्याचे वृत्त चुकीचे असून हा अफवा पसरवून देशाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केले.

बुधवारी २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी पंतप्रधानांना संयुक्त संसदीय समितीसमोर बोलाविण्याच्या विषयावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात राजकीय संघर्ष छेडला गेला आहे. याशिवाय कोळसा खाण घोटाळा प्रकरणी संसदेत एकाकी पडूनही भाजप पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. त्यांनी गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशी या मागणीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडले आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांवर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्याच्या दृष्टीने भाजपचे खासदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त एका प्रतिष्ठीत दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. मात्र स्वराज यांनी या वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.

काँग्रेसने मात्र अशी परिस्थिती उद्भवल्यास मध्यावधी निवडणुका घेण्याऐवजी जे खासदार राजीनामा देतील; त्यांच्या मतदारसंघातच निवडणुका घेण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे काँग्रेसचा फायदाच होईल; असा पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांचा दावा आहे.

Leave a Comment