क्रिकेटपटूंचा सन्मान राखा

आपल्या देशात क्रिकेटपटूंना जितका मान दिला जातो तितकेच अपमानितही केले जाते. एखादा क्रिकटपटू कीर्तीच्या शिखरावर असतो तेव्हा क्रिकेटवेडे भारतीय लोक त्याला डोक्यावर घेतात आणि त्याच्या कडून भलत्याच अपेक्षाही करायला लागतात. पण त्याने त्या अपेक्षा पुर्‍या केल्या नाहीत की त्याला तितक्याच आवेगाने अपमानितही करायला मागेपुढे पहात नाहीत. प्रत्येकाच्या खेळात चढउतार असतातच. त्यामुळे त्यांना दोन्ही प्रकारांचा अनुभव येतो.

खेळ म्हटल्यावर त्यात चढ आणि उतार हे असणारच ही गोष्ट सामान्य माणसाला कळत नाही पण देशाचा क्रिकेटचा संघ निवडणार्‍या निवड समितीत बसलेल्या तज्ञांना ही गोष्ट समजू नये याचे सखेद आश्चर्य वाटते. खरे तर निवड समितीत अनेकदा माजी क्रिकेटपटूच असतात पण त्यांनाही या गोष्टीची जाणीव नसते. म्हणून अनेकदा क्रिकेट खेळाडू त्यांच्याकडून अपमानित होतात.

भारताचा शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे त्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने आंतरराष्ट*ीय क्रिकेटला राम राम ठोकला आहे. त्यामागचे कारण काही स्पष्ट झालेले नाही पण त्यामागे त्याला निवड समितीकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचेच कारण असावे असा अंदाज आहे. लक्ष्मणने ज्या प्रकारे आणि अचानकपणे निवृत्ती जाहीर केली तिच्यावरून तरी त्याच्या या निवृत्तीमागे त्याला मिळालेली वागणूक कारणीभूत असावी असे मानले जात आहे आणि काही ज्येष्ठ

क्रिकेटपटूंनी निवड समितीला दोष द्यायला सुरूवात केली आहे. लक्ष्मण हा केवळ शैलीदार फलंदाजच आहे असे नाही तर तो माणूस म्हणून फार चांगल आहे. क्रिकेटपटूंच्या बाबतीत नेहमी असा अनुभव येतो की ते थोड्याशाही यशाने हुरळून जातात आणि त्यांचे विमान आकाशात जाऊन पोचत. ते गर्वाने वागायला लागतात. पण लक्ष्मण हा सदैव नम्रपणे वागणारा चांगला माणूस आहे. त्यामुळे त्याला वाईट वागणूक मिळावी ही बाब अनेकांना खटकली आहे.

क्रिकेटपटूंच्या निवृत्तीची अनेकदा चर्चा होत असते. सध्या सचिन तेंडुलकरच्या बाबतीत अशी चर्चा सुरू आहे. त्याची क्रिकेट कारकीर्द २० वर्षांची झाली आहे म्हणून लोक तशी चर्चा करीत असतात. तशी लक्ष्मणची कारकीर्द काही फार मोठी नव्हती. १६ वर्षांची होती.त्याला न्यूझिलंडविरुद्धच्या दोन सामन्यांसाठी निवडण्यात आले होते. त्याची इंग्लंडमधील कामगिरी वाईट झाली होती. तिच्यावरून त्यालाच नव्हे तर इतरांनाही टीका सहन करावी लागली आहे. पण आता ती गोष्ट जुनी झाली आहे. तो आता खेळत असतानाच योग्य वेळी निवृत्त झाला आहे.

जोपर्यंत आपण हवे असतो तोपर्यंतच निवृत्त होण्यात शहाणपणा असतो असे जाणकार लोक सांगत असतात. त्याच्या निवृत्तीने मधल्या फळीत खेळणारा एक शैलीदार फलंदाज कमी झाला आहे. त्याने अचानकपणे निवृत्ती का जाहीर केली याचा कसलाही उलगडा त्याने स्वतः केलेला नाही. त्याने निवृत्ती जाहीर करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत तो फार कमी बोलला पण त्याच्या बोलण्यापेक्षाही त्याचा आविर्भाव अधिक बोलून गेला. त्याने तरुण खेळाडूंना संधी मिळावी म्हणून निवृत्त होत असल्याचे म्हटले. तसा त्यातून त्याचा त्यागच दिसून येतो पण हा त्याग वैतागातून केला गेला असेल तर त्या त्यागाला आत्मकेंद्रिततेची काळी किनार लागली आहे.

पत्रकारांनी त्याला खोदून खोदून निवृत्ती मागची कारणे विचारली पण त्याने ताकास तूर लागू दिले नाही. निवृत्तीच्या घोषणेत एवढा तरी मनमोकळेपणा असायला हवा होता. तसा तो नसल्यामुळे लोकांना नाना प्रकारच्या चर्चा करायला वाव मिळाला आहे. तो निवृत्तीच्या बाबतीत बरेच तत्त्वज्ञान सांगून गेला. आपला आवाज आपल्याला निवृत्त व्हायला सांगत होता म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे असेही तो म्हणाला. हे सारे योग्यच आहे. पण लक्ष्मणने आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाच असेल तर त्याने तो निर्णय आगामी दोन सामन्यांसाठी आपली निवड होण्याच्या आधी सांगायला हवा होता.

निवड झाल्यानंतर त्याने अचानकपणे हा निर्णय जाहीर केला आहे. याचा अर्थ आगामी दौर्‍यांसाठी निवड होणे आणि निवृत्तीची घोषणा यांच्या दरम्यान काही तरी असे घडले आहे की ज्यामुळे त्याचा निवृत्तीचा निर्णय पक्का झाला आहे. या दोन सामन्यांसाठी त्याची निवड जाहीर झाली तेव्हा ती त्याला कळवण्यात आली आणि ती कळवणार्‍या निवड समितीच्या सदस्याने त्याला मिळालेली ही शेवटची संधी आहे असे बजावले. त्यामुळे लक्ष्मण दुखावला असावा असे म्हटले जात आहे. असा काही प्रकार घडलाच असेल तर त्याला तो सदस्यही जबाबदार आहे कारण एखाद्या क्रिकेटपटूला असा निरोप पाठवण्याची निवड समितीची पद्धत नाही.

सौरव गांगुली आणि अन्य काही क्रीडा तज्ज्ञांनी ही निवड समितीकडून खेळाडूंना दिल्या जाणार्‍या वागणुकी विषयी नाराजी व्यक्त केली आहे. हरभजनसिग,रोहित शर्मा, पियुष चावला यांना अशा अनुभवातून जावे लागले असल्याचे या ज्येष्ठ खेळाडूंनी म्हटले आहे. म्हणूनच निवड समितीकडून अधिक परिपक्वतेची अपेक्षा आहे.

Leave a Comment