व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात पर्यटन बंदी कायम

नवी दिल्ली: संरक्षित व्याघ्र प्रकल्पांच्या कोअर क्षेत्रात पर्यटनाला केलेली बंदी पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत असूनही सरकारला वनपर्यटनासारख्या व्यावसायिक बाबींची एवढी चिंता का; असा सवालही खंडपीठाने केला आहे.

वाघांची सख्या कमी होता असल्याची चिंता व्यक्त करणाऱ्या एका जनहित याचिकेचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने दि. २४ जुलै रोजी व्याघ्र प्रकल्पांच्या कोअर क्षेत्रात पर्यटनावर बंदी घातली होती. या निर्णयावर सरकारने केलेल्या अपिलाची सुनावणी न्या. स्वतंत्र कुमार आणि न्या. ए. के. पटनायक यांच्या खंडपीठासमोर पार पडली. सरकारनेच यापूर्वी कोअर क्षेत्रात बंदी घालण्याचे सुचविले असताना आता ही बंदी उठविण्याची मागणी का; अशी विचारणाही न्यायालयाने केली.

या प्रकरणी दि. २९ ओगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल.

संरक्षित वनक्षेत्रात बफर झोनची निश्चिती न करणार्‍या राज्यांकडून दंड आकारणी करण्याबरोबरच न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्याची तंबी न्यायालयाने राज्यांना दिली आहे.

Leave a Comment