लवकरच विमान पाणी, जमीन आणि बर्फातूनही धावणार

लंडन: आकाश, जमीन आणि पाण्यातून धावणारे वाहन आपण आतापर्यत केवळ जेम्स बॉंडच्या चित्रपटात पाहिले असेल. मात्र अमेरिकन संशोधकांनी अशा प्रकारचे सर्वसंचारी विमान विकसित केले असून सन २०१४ पर्यंत ते युरोप आणि अमेरिकेच्या बाजारात उपलब्ध होणार आहे.

दोन व्यक्ती बसू शकणारे हे विमान कोणत्याही विशेष रन वे शिवाय आकाशात उड्डाण करू शकेल. हे विमान त्याच्या तळाला बसविण्यात आलेल्या हायड्रोफॉईल्समुळे पाण्यातही संचार करू शकेल आणि जमिनीबरोबरच बर्फातही सहज प्रवास करू शकेल. या विमानाला फोल्डिंगचे पंख असून जमीन किंवा पाण्यातून चालताना ते काढूनही ठेवता येणार आहेत.

लिझा अकोया असे नामकरण करण्यात आलेल्या या विमानाने सर्वप्रथम व्हीस्कांसिंग येथे एका प्रदर्शनात यशस्वी उड्डाण केले. सत्तराहून अधिक चाचणी उड्डाणे पार पाडल्यानंतर हे विमान अमेरिकेच्या बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. ताशी १५५ मैल वेगाने प्रवास करण्याची क्षमता असलेले हे विमान एकावेळी २ हजार ११ किलोमीटर अंतर पार करू शकते.

या सर्वसंचारी विमानाची किंमत असणार आहे सुमारे साडे तीन लाख डॉलर; अर्थात १ कोटी ९० लाख रुपये.

Leave a Comment