लक्ष्मणच्या निवृत्तीवरून उलटसुलट चर्चा

नवी दिल्ली- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांने शनिवारी घेतलेल्या निवृत्तीनंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आगामी न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली होती. तसेच त्यामधील पहिला कसोटी सामना २३ ऑगस्टपासून हैदराबाद येथे सुरू होणार होता. लक्ष्मणच्या या निवृत्तीच्या घोषणेमुळे त्याने सर्वांना धक्का दिला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या लक्ष्मणाच्या निर्णयामागील नेमके कारण समजू शकले नाही.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे तो दुखावला गेला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात लक्ष्मणने कोणतेही कारण स्पष्ट केले नसले तरी, निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे, असे त्याने सांगितले आहे. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेला एक दिवस उलटल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. त्याच्यावर कोणताही दबाव नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

लक्ष्मणच्या या निर्णयाची बीसीसीआय अध्यक्षांना कल्पना होती, अशी माहिती बोर्डाचे सचिव संजय जगदाळे यांनी दिली. त्याने आपला निर्णय हा अध्यक्षांशी बोलूनच घेतला आहे. आम्ही त्याच्यावर कोणतादी दबाव टाकलेला नाही, असे बीसीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले.

निवड समितीने त्याची न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यांसाठी निवड केली होती. त्यामुळे त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही. त्याने न खेळण्याच निर्णय का घतला याचे कारण तोच सांगू शकत, असे अन्य एका पदाधिकार्‍याने सांगितले. आम्ही लक्ष्मणच्या निर्णयाचा आदर करतो. त्याने देशासाठी अनेक चांगल्या खेळी केल्या. त्याचे देशासाठीचे योगदान मोलाचे आहे, असे श्रीकांत म्हणाला.

भारताचा माजी कर्णधार गांगुली म्हणाला की, अनुभवी खेळाडूसोबत संवाद साधण्याचे कौशल्य श्रीकांत यांच्याकडे नाही. ते भारताच्या क्रिकेटच्या भविष्याचा विचार न करता ते संघाची निवड करतात. ते फत्त* कोणालातरी काढतात व कोणाचातरी समावेश करतात. भारतीय क्रिकेट अशाने पुढे जाऊ शकत नाही. निवड समितीतील एका सदस्याने, निवडीनंतर लक्ष्मणला फोन केला व ही त्याची फेअरवेल मालिका ठरेल, असे त्याने त्यास सांगितले. त्यामुळे दुखावल्याने लक्ष्मणने निवृत्ती घेतली अशी चर्चा आहे.

Leave a Comment