नवी दिल्ली: कोळसा खाण घोटाळा प्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करीत भारतीय जनता पक्षाने बुधवारी पुन्हा संसदेचे कामकाज ठप्प केले. सरकारने चर्चेची तयारी दर्शवूनही विरोधकांनी राजीनाम्याची मागणी करीत गोंधळ घातल्याने दोन वेळा संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले.
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी कॅगने सरकारवर ठपका ठेवल्यानंतर विरोधी पक्ष; विशेषत: भाजप आक्रमक झाला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात अनेक घोटाळे उघड झाले असले तरीही आतापर्यंत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर थेट शिंतोडे उडाले नसल्याने त्यांची व्यक्तिगत प्रतिमा स्वच्छ राहिली. मात्र कोळसा खाण घोटाळा ज्या कालावधीत घडला त्यापैकी बराच काळ संबंधित मंत्रालय पंतप्रधानांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे भाजपने चर्चेला नकार देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लाऊन धरली आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महत्वाचा घटक असलेल्या जनता दल (युनायटेड) पक्षाने मात्र राजीनाम्याच्या मागणीला आपला पाठींबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर आपली ताकद वाढविण्यासाठी भाजपाने दिल्लीत उपस्थित असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संधान बांधण्यासाठी गळ टाकून ठेवला आहे. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा देण्याच्या मागणीला तृणमूल काँग्रेसने पाठींबा द्यावा या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
सत्ताधारी आघाडीने मात्र या विषयाबाबत भाजपवर पलटवार केला आहे. खाण घोटाळ्याबाबत संसदेत चर्चा घडून आल्यास भाजपशासित राज्यांमधील घोटाळेही बाहेर येण्याची शक्यता लक्शात घेऊन भाजप राजीनाम्याच्या मागणीचा कांगावा करून चर्चा टाळत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.