एकात्मतचे दर्शन

आसाम प्रश्नाला विपरीत वळण लावून भारतातली शांतता तसेच धार्मिक सौहार्द्र बिघडवण्याचा प्रयत्न पाकिस्तानातून सुरू झाला आहे. तसे पुरावे भारत सरकारच्या गृह खात्याने पाकिस्तानकडे पाठवले आहेत. समाजाची दिशाभूल करणारी चित्रे इंटरनेटवरून पाठवणारी ७८ संकेतस्थळे भारतीय तंत्रज्ञांनी शोधून काढली असून ती आता बंद करण्यात आली आहेत. असा प्रयत्न केवळ पाकिस्तानातूनच होत आहे असे नाही तर भारतातलेही काही दहशतवादी प्रवृत्तीचे लोक त्यात सहभागी आहेत.

सोलापुरात अशा तिघांना पकडण्यात आले असून त्यांनी काही दिशाभूरू करणारी चित्रे प्रसारित केली असल्याचे कबूल केले आहे. या चित्रात एक बाई बोलत असताना दाखवली असून ती आपल्यावर गुजरातेत बलात्कार झाला असल्याची हकिकत सांगत असल्याचे दाखवले आहे. ही चित्रफित बनावट असल्याचे पटकन ओळखू येते पण ज्यांना ती दाखवली जाते त्यांना तिच्यातला बनावटपणा लक्षात येत नाही. त्यांच्या धार्मिक भावना भडकवण्यास ती पुरेशी होते.

अशाच खोट्या प्रचारातून मुंबईत पेटवापेटवी करण्याचा प्रयत्न काही देशद्रोहयांनी केला पण हा प्रयत्न फसला. त्यांनी लोक बंगलोर आणि हैदराबादेत ईशान्य भारतातल्या लक्ष्य करण्यासाठी नव्याने अफवा परसरवायला सुरूवात केली. तिथे काही लोकांना कोक्राझार मध्ये काही मुस्लिम बालकांवर बोडो आंदोलक अत्याचार करीत आहेत अशा बनावट चित्रफिती प्रसारित केल्या. त्यांचा परिणाम झाला. ईशान्य भारतातले हजारो लोक मिळेल त्या गाड्यांनी आपल्या गावाकडे निघाले.

एकदा अशा स्थलांतराची लाट आली की ती थांबवणे अशक्य होऊन बसते कारण अफवेला काही उतारा नसतो.विशेषतः अफवेतून घबराट पसरली की ती कमी करणे फार अशक्य असते. ईशान्येतले लोक आपल्या गावाकडे गेले पण ते सगळे घाबरलेले होतेच असे नाही. त्यातल्या अनेकांची याच शहरात तटून राहण्याची तयारी होती. अनेकांना सामाजिक सघटनांनी संरक्षण देण्याची तयारी दाखवली होती. पोलिसांनीही काही लोकांना संरक्षणाचे आश्वासन दिले होते. या सगळ्या घटनांना हिंदू- मुस्लिम स्वरूप येत आहे पण, काही ठिकाणी मुस्लिम संघटनांनीही या ईशान्य भारतीयांना आपली शहरे सोडून न जाण्याची गळ घातली. त्यांना संरक्षण देण्याची हमी दिली. ही गोष्ट स्वागतार्ह आहे.

आपल्या गावी गेलेल्या काही लोकांनी आपण घाबरून आलो नाही असे सांगितले. ते ज्या घरात भाड्याने रहात होते त्या घरांच्या मालकांनी त्यांना आपापल्या गावी जायला भाग पाडले. त्यांच्यावर हल्ला झाला तर आपल्याला त्रास होईल अशी भीती या घरमालकांना वाटली. काही लोकांना तर त्यांच्या नोकरीच्या मालकांनी घराकडे जाण्याचा सल्ला दिला असेही काहींनी सांगितले. ईशान्य भारतातल्या आपल्या गावी गेलेल्या अनेकांनी परत जाण्याची तयारी दाखवली आहे. या निमित्ताने पसरवण्यात आलेल्या अफवांचा प्रभाव घटल्याचे हे लक्षण आहे. या अफवा पररवणार्‍यांनी बोडो आदिवासींच्या विरोधात काही भडकावू संदेश प्रसारित केले होते.

हे संदेश ज्यांना मिळतील त्यांना बोडो आदिवासी म्हणजे काय आहे हे नेमके माहीत नाही. आसाम आणि लगतची सहा लहान राज्ये यातले लोक चेहर्‍याने सारखेच असतात. मग तो मणिपूरचे असोत की नागालँडचे असोत. सिक्कीम आणि नेपाळच्या लोकांचाही तोंडावळा सारखाच असतो. म्हणूनच ईशान्य भारतातल्या कोणत्याही राज्यातल्या लोकांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करून टाकण्याचा या समाजकंटकांचा इरादा होता. पण तो फसला. या निमित्ताने काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या.

ईशान्य भारतीय कसे भारतभर विखुरलेले आहेत हे बघायला मिळाले. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते अत्यल्पसंख्य आहेत. पण त्यांचा कोणालाही कसलाही उपद्रव नाही. त्यांच्या भागात चांगली महाविद्यालये नाहीत म्हणून तिथले अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भारतातल्या अनेक विद्यापीठात शिकायला राहिलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ईशान्य भारतात धर्मांतरे होत आलेली आहेत आणि धर्मांतरितांना भारत हा त्यांचा देश नाही असे शिकवण्यात आले आहे. यातून निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी भारतातल्या अनेक संघटनांनी काम केले. या परिसरातल्या विद्यार्थ्यांना भारतात आणले. त्यातून दुरावा कमी होत आला. आता हे लोक भारतात मिसळत आहेत. ते अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत.

बंगळूर आणि हैदराबाद या शहरांत तर हे लोक हॉटेलांत एवढ्या मोठ्या संख्येने काम करीत आहेत की यातले बहुसंख्य लोक आपल्या गावाकडे गेल्यावर यातली अनेक हॉटेले बंद पडली आहेत. हे चित्र आपल्या मनाला उभारी देणारे आहे. या पूवीं ईशान्य भारतातले लोक म्हणजे नेपाळी तेवढे आपल्याला माहीत होते. ते लोक प्रामुख्याने गुरखा असून वॉचमनचे काम करीत असतात. गावागावात ते विखुरलले आहेतच. त्याशिवाय काही तिबेटी लोक स्वेटर्स विकायला येतात तेच माहीत होते पण आता अनेक प्रकारच्या व्यवसायात ते आहेत आणि ते भारताला आपला देश मानत आहेत पण ही एकात्मतेची भावना ज्यांना डाचत होती त्यांनी अफवांच्या साहयाने ती मोडण्याचा प्रयत्न केला. समाजाने त्यांना चांगले उत्तर दिले आहे.