हवाई सुंदरीच्या कुटुंबियांना न्याय द्या: ममता शर्मा

नवी दिल्ली: गीतिका शर्मा या हवाई सुंदरीचे शोषण झाल्याची बाब स्पष्ट असून तिच्या कुटुंबियांना त्वरित न्याय मिळणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी व्यक्त केले. गीतिकाचा शवविच्छेदन अहवाल माध्यमांपर्यंत पोहोचल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गीतिका शर्मा या हवी सुंदरीने आत्महत्या केली असून आत्महत्येला हरियानाचे माजी मंत्री गोपाल कांडा आणि गीतिकाची वरिष्ठ सहकारी अरुणा चढ्ढा जबाबदार असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद करून ठेवले आहे.

गीतिकाचे शोषण झाले ही बाब स्पष्ट असून पोलिसांनी तिच्या आत्महत्येच्या तपासाबाबत अक्षम्य विलंब केला असल्याची टीका शर्मा यांनी केली. आता या प्रकरणातील संशयित गोपाल कांडा हे पोलिसांना शरण आलेले असताना तरी या प्रकरणाचा वेगाने तपास करावा; असे आवाहन त्यांनी केले. गीतिकाचा शवविच्छेदन अहवाल आयोगाने मागणी करूनही पोलिसांनी उपलब्ध करून दिला नाही. अजून तो मंत्रालयातदेखील आलेला नाही. मात्र प्रसिद्धी माध्यमांना तो उपलब्ध झाला ही बाब गंभीर असल्याची टीकाही शर्मा यांनी केली.