हार्डवेअर इंजिनिअरींग

hardware

संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची किती झपाट्याने वाढ होत आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र माहिती तंत्रज्ञान म्हटल्यानंतर सॉफ्टवेअरची जास्त चर्चा होते आणि हार्डवेअरकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सॉफ्टवेअरचा शोध कितीही क्रांतीकारक असला तरी जोपर्यंत त्याला हार्डवेअरची जोड मिळत नाही तोपर्यंत ते सॉफ्टवेअर चालूच शकत नाही. म्हणून हार्डवेअरला सुद्धा सॉफ्टवेअरएवढेच महत्व आहे.

हार्डवेअरच्या अभ्यास क्रमांची माहिती लोकांना फारशी नसते. मात्र ही अडचण विचारात घेऊन भारतात काही शैक्षणिक संस्थांनी हार्डवेअरविषयक अभ्यासक्रम जाणीवपूर्वक विकसित केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर टेक्नॉलॉजी (आय.आय.एच.टी.) ही अशी एक अग्रणी संस्था आहे. या संस्थेच्या संकेतस्थळाचा पत्ता www.iiht.com असा आहे.

या संस्थेच्या हार्डवेअरविषयक अभ्यास क्रमांमध्ये हार्डवेअरशी संबंधित अनेक विषय शिकवले जातात. त्यामध्ये नेटवर्किंग सिक्युरिटी, नेटवर्किंग मॅनेजमेंट, टेलिकम्युनिकेशन्स् अशा विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य असे की, हार्डवेअरच्या क्षेत्रामध्ये जगात नाव कमवलेल्या कंपन्यांशी सहयोग करूनच हा अभ्यासक्रम बेतलेला आहे आणि त्यांच्या सहयोगातूनच तो चालवला जात असतो. अशा कंपन्यांमध्ये एच.पी., मायक्रोसॉफ्ट, सन्, ओरॅकल, कॉम्पशिया या कंपन्यांचा समावेश आहे. या सार्या जगप्रसिद्ध कंपन्या असल्यामुळे या संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्राप्त होणारे प्रमाणपत्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानले जाते. या कंपन्यांमध्ये हार्डवेअर क्षेत्रात स्वत: संशोधन करणारे संशोधक कार्यरत असतात आणि ते या अभ्यासक्रमाला अध्यापनासाठी उपलब्ध असतात. त्यांच्या माध्यमातून या क्षेत्रातले अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकते.

या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जेटकिंग कॉम्प्युटर हार्डवेअर ऍन्ड नेटवर्किंग इन्स्टिट्यूट ही संस्था सुद्धा काही अभ्यासक्रम शिकवित असते. या संस्थेचे जेटकिंग सर्टिफाईड हार्डवेअर ऍन्ड नेटवर्किंग प्रोफेशनल असे प्रमाणपत्र मिळते. या संस्थेच्या संकेतस्थळाचा  पत्ता www.jetkinginfotrain.com असा आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असला पाहिजे. हा अभ्यासक्रम तेरा महिन्यांचा आहे आणि या तेरा महिन्यात ६५० तास शिकवले जाते. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स्, कॉम्प्युटर हार्डवेअर ऍन्ड पेरिफेरल्स्, एमसीएसए आणि नेटवर्किंग ऍडमिनिस्ट्रेशन इत्यादी विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असतो. टेक्निकल बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या संस्थेने काही प्रगत अभ्यासक्रमसुद्धा सुरू केलेले आहेत. इच्छुकांनी वरील संकेतस्थळावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवावी.  

 

Leave a Comment