वन खात्यातील संधी

गेल्या ३० वर्षांपासून भारतामध्ये जंगलांच्या संरक्षणाबाबत फार दक्षता बाळगली जायला लागली आहे. त्यातल्या त्यात वन्य जीवांच्या संरक्षणाच्या बाबतीत मोठीच दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे वन खात्यामध्ये हजारो नोकर्या निर्माण होत आहेत आणि त्यासाठी प्रशिक्षित उमेदवारांची गरज भासत आहे. गरजेच्या मानाने उमेदवार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या खात्यात अनेक जागा रिकाम्या पडलेल्या आहेत. भारताचे वनक्षेत्र वरचेवर कमी होत आहे आणि ते वाढविण्याची आवश्यकता आहे. याचा विचार करून भारतातल्या विविध विद्यापीठांनी जंगल आणि वन यांच्या संबंधात नवनवे अभ्यासक्रम विकसित केलेले आहेत.

केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी अशा अभ्यासक्रमांच्या बाबतीत मोठीच आघाडी घेतलेली आहे. तूर्तास तरी या संस्थांनी या विषयाशी संबंधित असलेले बी.एस्सी.चे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. विशेषत: केरळ कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीतील कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री या संस्थेमध्ये या विषयाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. १९८० च्या दशकामध्ये या संस्थेने पहिल्यांदा हा अभ्यासक्रम विकसित केला आणि त्यानंतर राज्यातल्या अनेक शिक्षण संस्थांनी त्याचा आधार घेऊन छोटे-मोठे अभ्यासक्रम तयार केले. अशाच प्रकारचे अभ्यासक्रम तमिळनाडूच्या अनेक महाविद्यालयांमध्ये सुरू झालेले आहे. तमिळनाडू विद्यापीठाशी सलग्न असलेल्या मेट्टुपलायम येथील फॉरेस्ट कॉलेज ऍन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये तर पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि संशोधनाचीही संधी उपलब्ध आहे. या संस्थेत एका वेळी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या संस्थेतून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या काही विद्यार्थ्यांनी नंतर आय.ए.एस.ला समकक्ष असलेल्या आय.एफ.एस.च्या परीक्षा उत्तीर्ण होऊन या क्षेत्रात खूप नाव कमावलेले आहेत.

आय.एफ.एस.ची पदवी मिळाल्यानंतर तर उत्तम पगाराची नोकरी मिळतेच, पण इतर पदव्या मिळविलेले विद्यार्थी सुद्धा फॉरेस्ट रेंजर्स, असिस्टंट कॉन्झर्वेटर्स आणि असिस्टंट सायन्टिस्ट अशा पदव्या प्राप्त करू शकतात. या अभ्यासक्रमामध्ये कृषी अभियांत्रिकी, पशु वैद्यकीय, रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र, वनशास्त्र, भूगर्भ शास्त्र आणि प्राणीशास्त्र एवढ्या विषयांचा अभ्यास समाविष्ट करण्यात आलेला असतो.

हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी जंगलामध्ये प्राणी आणि वनस्पती या दोन्हींच्या संबंधात चांगले काम करू शकतात. हा अभ्यासक्रम प्रदान करणार्या संस्था कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर हेब्बळ (कर्नाटक), केरळ ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी वेलाणीकारा (केरळ), कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर ऍन्ड रिजनल रिसर्च स्टेशन, धारवाड (कर्नाटक) अशा आहेत. दक्षिणेतल्या चारही राज्यांमध्ये जंगल आणि वन यांच्या संबंधात भरपूर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.   

 

Leave a Comment