लष्करातील संधी

लष्करातील नोकरीच्या संधी म्हणजे नेमके काय, याविषयी लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज असतात. लष्करातली नोकरी म्हणजे केवळ लढाई करणे नव्हे. लढाई करणार्‍या जवानांना चांगली साधने पुरविणे, त्यांच्या विविध सुविधांसाठी संशोधन करणे अशा कामात गुंतलेले न लढणारे अनेक लोकही लष्कराचेच कर्मचारी समजले जात असतात.  सध्याच्या काळामध्ये संरक्षणविषयक सिद्धता म्हणजे केवळ शस्त्र आणि जवान उभे करणे नव्हे असे लक्षात आलेले आहे. लष्करी सिद्धतेसाठी अभियांत्रिकी स्वरुपाची अनेक कामे आणि संशोधन करावे लागत असते.

डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) या संस्थेतर्फे असे संशोधन हाती घेतले जात असते आणि तिथे हजारो अभियंत्यांची गरज असते. इंजिनिअर होण्याची महत्वाकांक्षा असलेल्या तरुणांपैकी बहुसंख्यांना लष्करातल्या या संधीची माहितीच नसते. प्रत्यक्षात मात्र डीआरडीओ मध्ये हजारो अभियंत्यांची गरज आहे. कारण लष्कराशी संबंध असलेल्या विविध कामांसाठी देशभरात ५२ प्रयोगशाळा काढण्यात आलेल्या आहेत आणि या प्रयोगशाळांमध्ये लष्करी सिद्धतेचे तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानाच्या आधारे शस्त्रांची निर्मिती, साधने आणि नवे संशोधन यांच्या अंगाने प्रदीर्घ संशोधन केले जात असते. डीआरडीओने सध्या तरी सहा विषयांवर लक्ष केंद्रित केलेले आहे. ते विषय म्हणजे सायबर सेक्युरिटी, डिफेन्स इलेक्ट्रोनिक्स्, एरॉनॉटिक्स, मायक्रो इलेक्ट्रोनिक्स्, डिव्हाईसेस, नॅनो मटेरियल, नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. या सहा विषयांवर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांची डीआरडीओला आणि देशाला मोठीच गरज आहे आणि डीआरडीओच्या नोकरी भरती विषयक विभागातर्फे अशा शास्त्रज्ञांचा आणि अभियंत्यांचा सतत शोध घेतला जात असतो.

डीआरडीओने या भरतीसाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेली आहे. तिच्यातर्फे सायंटिस्ट एंटरन्स टेस्ट ही परीक्षा दरसाल घेतली जाते. या परीक्षेची जाहिरात दरवर्षाच्या सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी प्रसिद्ध होते. दोन सत्रांमध्ये होणार्‍या या परीक्षेत १०० प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न बी.ई., बी.टेक आणि एम.एस्सी. या अभ्यासक्रमांशी संबंधित असतात. दुसर्‍या सत्रामध्ये असेच १०० प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न करंट अफेअर्स, जनरल अवेरनेस आणि ह्यूमन स्कीलस् या संबंधी असतात. डीआरडीओमध्ये भरपूर जागा रिकाम्या असतील तरच ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळे दरवर्षी ती होईलच याची काही खात्री नाही. मात्र एका परीक्षेतून साधारणपणे २०० ते ३०० शास्त्रज्ञांची भरती केली जाते. काही वेळा गरजेनुसार देशातल्या काही प्रतिष्ठीत संस्थांमध्ये जाऊन डीआरडीओचे अधिकारी बी.ई. किवा बी.टेकच्या शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस् इन्टरव्ह्यू घेतात.

Leave a Comment