लक्ष्मणचा क्रिकेटला बाय बाय

भारतीय क्रिकेट संघाचा तारणहार व संकटमोचक असलेल्या वी. वी. एस. लक्ष्मणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वानाच धक्का दिला आहे. न्यूझीलंडविरूद्धचा कसोटी सामना अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपला असताना या शैलीदार फलंदाजाने अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. ३७ वर्षीय लक्ष्मणने निवृतीसाठी हीच वेळ योग्य असून नवोदितांना संधी देण्याच्या उद्देशाने क्रिकेटला अलविदा करीत असल्याचे सांगितले. त्याने निवृत्ती जाहीर केली असली तरी निवड समितीच्या दबावाखाली त्याने हा तडकाफडकी निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

लक्ष्मणने फेबुवारी १९९४ मध्ये १९ वर्षाखालील मुलांच्या भारतीय क्रिकेट संघातून पदार्पण केले. त्याने या कामगिरीच्या जोरावर नोव्हेबर १९९६ मध्ये त्याने दक्षिण आफ्रीकेसोबतच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले. या त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने ५१ धावा करत निवड समितीचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे लो स्कोरिंग कसोटी सामन्यात भारताने लक्ष्मणच्या अर्धशतकाच्या जोरावर विजय मिळविला होता. मनगटातील जादुई फटक्याच्या जोरावर त्याने अझहरुद्दीनच्या खेळीची आठवण करून दिली. त्याने हा शॉट खेळताना या तंत्रात सुधारणा करीत त्याने माजी कर्णधार अझहरूद्दीनला सुद्धा मागे टाकले होते.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध ४ जानेवारी २००० मध्ये लक्ष्मणने पहिले कसोटी शतक ठोकले. त्याने १९८ चेंडूत १६७ धावा केल्या होत्या. एकीकडे भारतीय फलंदाज या पिचवर खेळण्यात अपयशी ठरत असताना त्याने संस्मरणीय खेळी करीत त्याची गुणवता सिद्ध केली.

ऑस्ट्रेलिया संघासाठी लक्ष्मण हा नेहमीच कर्दनकाळ ठरला. त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्च्या चिवट कामगिरीमुळे काही ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला त्याला बाद कसे करावे हे समजत नव्हते. २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेंव्हा ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली विजयी घोडदौड सुरु होती. ऑस्ट्रेलिया संघाला पराभव करणारा कुठलाच संघ त्यावेळी नव्हता. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने त्यांच्या लौकिकास साजेशा खेळ करताना तीन कसोटी सामन्याच्या मालिकेतील पाहिली कसोटी जिंकून त्याने त्यांची विजयी घोडदौड सुरु केली होती. दुसऱ्या कसोटी सामण्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा करताना भारतीय संघाला १७१ धावात बाद केल्याने भारतावर फॉलोओनची नामुष्की आली होती. मात्र कलकत्त्यातील इडन गार्डन मैदानावर भारताचा संकटमोचक लक्ष्मण पुन्हा एकदा धावून आला. त्याने ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडताना राहुल द्रविडच्या मदतीने ३४५ धावची भागीदारी केली. लक्ष्मणने १० तासांपेक्षा अधिक काळ खिंड लढविताना ४४५ चेंडूत ४४ चौकाराच्या मदतीने २८१ धावाची आक्रमक फलंदाजी केली. या लक्ष्मणच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाचे कसोटी मालिका जिंकण्याचे स्वपन तर चक्काचूर झाले. या सामन्यासोबतच भारतीय संघाने तिसरा सामना जिंकत मालिका जिंकली.
लक्ष्मणच्या या खेळीचा ऑस्ट्रेलिया संघाने तेंव्हापासून चांगलाच धसका घेतला होता.

दोनच वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतात झालेल्या मालिकेत भारतीय संघाला विजयासाठी २३३ धावाचे माफक आव्हान असताना भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज लवकर बाद झाल्याने भारताची अवस्था ८ गडी बाद १२० अशी होती. मात्र त्यवेळी लक्ष्मणने पुन्हा एकदा चिवट फलंदाजी करताना शतक झळकाविले. ऑस्ट्रेलिया संघाच्या तोंडाशी आलेला विजय त्याने खेचून आणला. शेवटच्या जोडीसाठी लक्ष्मणने वेगवान गोलंदाज इशांत शर्माला सोबत घेऊन ६० धावची भागीदारी केली. त्याची ही खेळी आजही कुठला भारतीय विसरू शकत नाही. लक्ष्मणने १८ ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केल्याने यापुढील काळात ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑगस्ट हा स्वतंत्र्यदिन म्हणून साजरा केला जाईल.

लक्ष्मणने १७ वर्षाच्या त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत १३४ कसोटी सामन्यात २२५ डाव खेळताना ८ हजार ७८१ धावा केल्या. यामध्ये २८१ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ४५.९७ च्या सरासरीने १७ शतके व ५६ अर्धशतके त्याने ठोकली आहेत. २३ ऑगस्ट पासून न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामान्याच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती. त्यामाधील एक सामना हा हैदराबाद येथील त्याच्या होमग्राऊडवर खेळला जाणार होता. हा सामना खेळून तो निवृत्ती पत्करेल असे सर्वाना वाटत होते मात्र त्याने अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वाना बुचकळ्यात टाकले आहे.

दुसरीकडे मात्र लक्ष्मणने त्वरित निवृत्ती जाहीर करावी यासाठी गेल्या काही दिवसापासून भारतीय निवड समितीने दबाव आणला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनंतर त्याने निवृत्ती जाहीर करावी यासाठी निवड समिती प्रयत्नशील होती. मात्र लक्ष्मणने नवीन खेळाडूना संधी देण्याचे कारण पुढे करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. लक्ष्मणने आतापर्यंत देशासाठी केलेली कामगिरी लक्षात घेऊन निवड समितीने त्याला सन्मानाची वागणूक द्यायला हवी होती. आगामी काळात यामधून निवड समितीने काही तरी बोध घेऊन वरिष्ठ खेळाडूना योग्य सन्मान देण्याची गरज आहे.

Leave a Comment