गंगोत्री – पुण्यसरिता गंगेचा उगम

भारतीयांच्या हृदयात गंगा नदीचे नक्की काय स्थान आहे याचे वर्णन करणे अवघड आहे. स्वर्गीची गंगा भगीरथाने महत् प्रयत्नांनी भूलोकी आणली आणि या पुण्यसरितेने अवघे भारतवर्ष पावन केले. नदी ही जीवनदायिनी असतेच पण त्यातही गंगा ही केवळ जीवनदायिनी नाही तर त्यापेक्षाही अधिक कांहीतरी आहे. गंगेचे पाणी कितीही काळ साठविले तरी ते खराब होत नाही. म्हणूनच न परतीच्या प्रवासाला निघालेल्या आपल्या प्रियजनांच्या मुखात घालण्यासाठी गंगोदकाचा गडू बहुतेक हिंदू कुटुंबात देवघरात ठेवलेला असतो. भारतीयांचे गंगामातेशी असे वेगळेच भावबंध जोडलेले आहेत. हिमालयातील चारधाम यात्रेतील गंगोत्री हे स्थान म्हणूनच पाहायला हवे. श्रद्धावंतांनी भावापोटी पाहावे तर ज्यांची देवावर श्रद्धा नाही त्यांनी निसर्गसौदर्याच्या अनुभूतीसाठी गंगोत्रीला भेट द्यावी.
Gangotri1
हृषिकेशपासून गंगोत्रीला जाता येते. उत्तरकाशीपासून ९९ किमीवर असलेले गंगोत्री समुद्रसपाटीपासून ३१०० मीटर उंचीवरचे ठिकाण आहे. उत्तरकाशी, तिलबाडा,

Gangotri
रूद्रप्रयाग आणि गंगोत्री हा नेहमीचा मार्ग. हिमालयन रेंजमध्ये येणार्‍या गंगोत्रीला आहे गंगादेवीचे सुंदर मंदिर. अर्थात येथे ती वाहते भागीरथी म्हणून.  देवप्रयाग येथे तिचा अलकनंदेशी संगम होतो आणि त्यापुढे ती गंगा म्हणून ओळखली जाते. गंगोत्री हेच गंगेचे उगमस्थान मानले जात असले तरी प्रत्यक्ष उगम गंगोत्रीपासून ३ किमीचा अडचणीचा रस्ता पार केल्यावर आहे. त्याला म्हणतात, गोमुख. येथे वाहने जात नाहीत. घोड्यावरून अथवा पायीच जावे लागते. संपूर्ण रस्ता म्हणजे निसर्गप्रेमींच्या डोळ्यांना मेजवानीच आहे. शांत, देखणा परिसर मनालाही शांत अवस्थेत नेणारा.
Gangotri-2
यामागची कथा अशी सांगितली जाते की राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांचे पापक्षालन करून त्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न करून गंगेला भूलोकी आणले. राजा सगराने पृथ्वीवरील राक्षसांचा नाश करून सम्राटपद मिळविण्यासाठी अश्वमेध यज्ञ केला. त्याच्या शक्तीने घाबरलेल्या इंद्राने हा अश्व समाधिस्त असलेल्या कपिल ऋषींच्या आश्रमात नेऊन बांधला. सगराचे साठ हजार पुत्र आश्रमात आले व गैरसमजाने त्यांनी आश्रमाची नासधूस केली. समाधीतून जागे झालेल्या कपिल मुनींनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी दिलेल्या शापामुळे हे सर्व पुत्र नष्ट झाले. त्यांची रक्षा वाहून नेण्यासाठी आणि त्यांना मोक्ष मिळावा म्हणून राजा दिलीपाने तपश्चर्या केली त्यानंतर भगीरथाने तप केले. भगीरथावर गंगा प्रसन्न झाली आणि पृथ्वीवर आली. ज्या शिलेवर बसून भगीरथाने हे तप केले ती भगीरथशिला मंदिराजवळच आहे.
Gangotri-3
गंगा मंदिर अतिशय सुंदर, अति स्वच्छ आणि फरसबंदी आवाराचे आहे.सध्याचे हे मंदिर जयपूर नरेशांनी बांधले आहे. मात्र १८ व्या शतकात हे मंदिर गोरखा अमरसिंह थापा यांनी बांधल्याचे सांगितले जाते. गाभार्‍यात सिंहासनावर तीन मूर्ती दिसतात. मधली गंगेची असून डावीकडे यमुना आणि उजवीकडे सरस्वतीच्या मूर्ती आहेत. गंगा व यमुना मूर्तींचे मुखवटे सोन्याचे आहेत. तेथेच खाली डावीकडे भगीरथ आणि अन्नपूर्णेची मूर्ती आहे. लाखो भाविक या स्थानाला दरवर्षी भेट देत असतात. येथे टॅक्सी, बसेस थेट येतात. डोगर चढावे लागत नाहीत.
Gangotri-4
मंदिरातून थोड्या पायर्‍या खाली उतरून गेले की भागीरथी नदीचे पात्र लागते. हे ठिकाण उंचीवर असल्याने थंडी असतेच तसेच नदीचे पाणीही थंडगार आहे. दूरवरची हिमशिखरे सतत सोबत करत असतात. नदीच्या उजव्या तीरावर मंदिर आहे तर डाव्या तीरावरून चालत गेले की थोड्या अंतरावर सहस्त्रधारांनी खाली उडी घेणारी गंगा दिसते. तिचे हे रूप रौद्र आहे. आसपास सूचीपर्णी वृक्षांचे जंगल, विविध प्रकारची दगडीफुले. नेची सारख्या वनस्पती असून डोळे उघडे ठेवून हे वेगळे सौदर्यही टिपायला हवे. मंदिरापासून थोडे चालत गेले की सूर्यकुंड लागते. हा एक धबधबाच असून आश्चर्यकारक रंगांच्या खडकातून हा प्रवाह वेगाने वाहतो. नदीचे पाणी अतिशय स्वच्छ आणि निर्मळ आहे. येथून आणखी थोडे पुढे गेले की गौरीकुंड म्हणून एक जागा आहे. रस्ता सोडून थोडे खाली उतरून जायचे आणि खोल कपारीत अतिशय वेगाने घुसळण करत असलेला नदीचा प्रवाह श्वास रोखून धरून पाहायचा. पाण्याचा वेग पाहून छातीत धडकीच भरते.
Gangotri-5
गंगोत्रीत डोंगररांगांमध्ये अनेक लहान मोठ्या गुहा आहेत. येथे तपस्वी साधना करण्यासाठी राहतात. ना दिवे, ना अन्य काही सोयी. पण गंगेच्या सानिध्यात तपश्चरण करायचे म्हणून सर्वसंग परित्याग करून येथे साधक येतात. अनेक तरूण साधकही दिसतात. गुरू आज्ञेने येथे येऊन साधना करतात. गंगोत्रीला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे मार्च ते आक्टोबर. थंडीत हे ठिकाण पूर्ण बर्फाच्छादित असते. राहण्यासाठी हॉटेल्स आहेतच पण गढवाल निगमची हॉटेल्स सर्वात उत्तम. अर्थात आधी बुकींग करूनच येथे यायला हवे. तसेच हवेची लहर कधी फिरेल याचा नेम नसल्याने पुरेसे गरम कपडे आणि हाय अल्टीट्यूडचा त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ती औषधे बरोबर असावीतच.