
उद्योजकता हा माणसाला जन्मत:च प्राप्त होणारा गुणधर्म आहे असे मानले जाते. पण आता आता याही विषयाचे अनेक मार्गदर्शक वर्ग निर्माण झाले आहेत. एखादा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्याला उद्योजक होता येईल, असा दावा आता या अभ्यासक्रमाचे संयोजक करीत आहेत. तेव्हा एखाद्याला कारखानदार किंवा उद्योगपती बनवणारा अभ्यासक्रम आहे का, असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर होय असे आहे. घरात उद्योगाची कसलीही परंपरा नसलेले अनेक लोक (पहिल्या पिढीतले उद्योजक) या क्षेत्रात येतात. अनेक अडचणी सहन करून आणि धक्के खात, अनेक अपयशे पचवून शेवटी यशस्वी होतात. या प्रवासात आलेले अनेक प्रकारचे अनुभव हेच त्यांना शिकवत असतात आणि त्या अनुभवातूनच ते घडत असतात. मात्र त्यांना उद्योजकतेचे धडे कॉलेजात घेता आले तर त्यांची वाटचाल अधिक सुकर होते आणि बसणारे धक्के कमी होतात. अशा उद्योजकांची वाटचाल काही वेळा इतकी संघर्षमय असते की त्यांना उशिरा यश मिळते. त्यांना आपल्या हयातीत या यशाची फळे चाखता येत नाहीत. त्यांची पुढची पिढी ते लाभ घेत असते. अशा लोकांना उद्योजकतेचे धडे मिळाले असते तर त्यांना २० वर्षात मिळालेले यश १० वर्षांत मिळाले असते. म्हणून उद्योजकता हा विषय तयार करण्यात आला आहे. या विद्या शाखेचे शिक्षण नेमके कसे द्यावे याची निश्चिती करण्यात आलेली नसल्याने अनेक संस्था आपापल्या परीने त्याचे शिक्षण देत आहेत.
