अंतरीक्ष क्षेत्रातील संधी

अंतराळ संशोधनामध्ये भारताने फार मोठी आघाडी मिळवलेली आहे. या क्षेत्रात भारताचा क्रमांक जगातल्या पहिल्या पाच देशामध्ये आहे . या क्षेत्रामध्ये भारतातील इस्रो ही संघटना कार्यरत आहे आणि तिने व्यापार करावा, अशी सरकारची कल्पना आहे. त्यामुळे सरकारने अंतराळ संशोधन करणार्‍या इतरही अनेक देशांना मदत करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा उघडलेली आहे. त्यातून अंतराळ संशोधनातल्या अनेक करिअर संधी विकसित झाल्या असून संशोधक बुद्धीच्या तरुणांना त्या खुणावत आहेत. या क्षेत्रामध्ये स्वतंत्रपणे अभ्यास करून पदार्पण करता येते. दोन मुख्य शाखांमध्ये या क्षेत्राचा अभ्यास केला जातो. एअरॉनॉटिकल इंजिनिअरींग आणि अॅस्ट्रोनोटिकल इंजिनिअरींग.

या शाखांची ढोबळ माहिती द्यायची झाली तर असे म्हणता येईल की, एअरॉनॉटिकल इंजिनिअरींग ही शाखा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातल्या क्षेत्रातील विमानांचे उड्डाण आणि कार्यवाही नियंत्रित करते तर अॅस्ट्रोनोटिकल इंजिनिअरींग हे शास्त्र या कक्षेच्या बाहेरच्या उड्डाणांचे नियंत्रण करते. या संबंधातील विद्याशाखा नवीन आहेत. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण आणि शिक्षण आय.आय.टी.सारख्या संस्थांमध्येच होत असते. चेन्नईच्या आय.आय.टी. मध्ये या शाखांच्या पदव्या मिळण्याची सोय आहे. या अभ्यास क्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी आयसॅट नावाची राष्ट्रीय पातळीवरची प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेनंतर तोंडी मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. या दोन्ही अभ्यासक्रमांना जोडून चार महिन्यांचा इंटर्नशीपचा प्रोग्राम असतो, ज्या काळामध्ये हे उमेदवार इस्रो सारख्या संस्थेमध्ये प्रत्यक्षात काम करतात. चेन्नईच्या आय.आय. टी.मध्ये या विषयाच्या पदव्युत्तर पदवीची त्याचबरोबर सशोधन करून डॉक्टरेट करण्याची सुद्धा सोय आहे. बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस या संस्थेमध्ये एअरोस्पेस इंजिनिअरींगचा पदवी अभ्यासक्रम आहे. या संस्थेतल्या पदवीधरांना सुद्धा अंतराळ संशोधनात नोकरीच्या चांगल्या संधी मिळतात.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ), संरक्षण खात्याशी संबंधित प्रयोगशाळा, विमान कंपन्या आणि विमान तयार करणार्‍या कंपन्यांमध्ये या पदवीधरांना उत्तम नोकर्‍या मिळू शकतात. देशाचे अवकाशयान अंतराळात पाठविणे, क्षेपणास्त्रे तयार करणे अशी आव्हानात्मक कामे करून देशाचा गौरव वाढविण्याची संधी या पदवीधरांना मिळते . या दोन क्षेत्राशी संबंधित निरनिराळ्या अभ्यासक्रमांची सोय दक्षिण भारतातल्या काही संस्थांमध्ये आहे. त्यामध्ये अमृता युनिव्हर्सिटी कोईमतूर, व्ही.एस.एम. एअरोस्पेस, बंगळूर, एस.आर.एम. युनिर्व्हसिटी चेन्नई इत्यादी संस्थांचा समावेश होतो.

Leave a Comment