गीतकार व्हायचंय्

चित्रपटांसाठी गीते लिहून भरपूर पैसा कमावणार्‍या गीतकारांची नावे आपल्याला पाठ आहेत. मराठीत जगदीश खेबुडकर, प्रविण दवणे आदी नावे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर हिंदीमध्ये शकील बदायुनी, आनंद बक्षी, जावेद अख्तर, गुलजार, प्रसून जोशी ही नावे आता सर्वपरिचित झालेली आहेत. परमेश्‍वरांनी या लोकांना काव्य प्रतिभेची देणगी दिलेली असते. त्यामुळे त्यांना कविता करता येतात आणि अशा कविता करता करता कधी तरी त्यांनी चित्रपटातल्या एखाद्या विशिष्ट प्रसंगाची गरज ओळखून त्या प्रसंगावर गीत करून दिलेले असते आणि बघता बघता या व्यक्तीला ही खुबी माहीत झालेली आहे हे लक्षात आले की, चित्रपट निर्मार्त्यांची त्यांच्याकडे रिघ लागते. त्यांना मग पैसा, प्रसिद्धी यांची काही वानवा भासत नाही. त्यांचे यश बघून अनेक तरुणांना आपणही असेच गीतकार म्हणून प्रसिद्धीस यावे असे वाटत असते. तसा विचार केला तर हे करिअर करण्यासाठी मुळात प्रतिभाशक्तीची गरज आहे. ज्याच्या अंगी ही उपजत शक्ती नसेल तो या क्षेत्रामध्ये काहीच करू शकणार नाही.

मात्र, आज आपण आपल्या नजर टाकली तर असे लक्षात येते की, गावोगाव अशा उपजत कवींची काही टंचाई नाही. परंतु समाजात अशा कवींना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची टवाळी करण्याकडेच लोकांचा कल असतो. तरी सुद्धा अशा तरुण कवी-कवयत्रींनी या क्षेत्रात आपले नशीब आजमावून पाहण्यास काहीच हरकत नाही. संधी भरपूर आहे. केवळ चित्रपटातच गाणी लिहिली पाहिजेत असे काही नाही. ऑर्केस्ट्रासाठी गाणी लिहिता येतात आणि टी.व्ही.वर दर दिवशी नव्याने एक मालिका प्रदर्शित होत आहे. अशा मालिकांचे टायटल सॉंग आणि मालिकातील गाणी लिहिण्यासाठी सुद्धा कवींची गरज असते. महाराष्ट्रात अमाप कवी आहेत आणि ते या क्षेत्रात करिअर करू शकतात. परंतु अशा शंभर कवीतला एखादाही कवी या क्षेत्राकडे वळत नाही. विशेष प्रयत्न केल्यास त्यांना हे करिअर नक्की करता येईल. या कवींसाठी उपलब्ध असलेली आणखी एक संधी म्हणजे जाहिरातींचे लिखाण.

आज टी.व्ही., रेडिओ आणि वृत्तपत्रांमध्ये दररोज नवनव्या जाहिराती प्रकट होत आहेत. त्या जाहिरातींची काव्यमय कॉपी लिहिणे हे सुद्धा प्रतिभाशक्तीचेच काम आहे. या कामातून कवींना चांगली मिळकत होऊ शकते. आकाशवाणीवरच्या जाहिरातींना जिंगल्स असे म्हटले जाते आणि त्यासाठी छोटी छोटी गाणी लिहावी लागतात. असे असले तरी यात कवींचे आणि गीतकारांचे यश बर्‍याच अंशी त्या गीतांना चाली लावणार्‍या संगीत दिग्दर्शकांवर अवलंबून असते. हीच गोष्ट जिंगल्सनाही लागू पडते. जाहिराती साठी लिहिलेल्या जिंगल्स् संगीत दिग्दर्शनामुळेच उठावदार होत असतात. तेव्हा केवळ गीत रचून आणि कविता करून भागत नाही, तर त्याला चांगला संगीत दिग्दर्शकही शोधला पाहिजे.