एम.सी.ए. पदवीबाबत…

mca

सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञानाविषयी फार आकर्षण निर्माण झालेले आहे. या क्षेत्रामध्ये तज्ञ व्यक्तींची फार वानवा आहे. त्यामुळे चांगले तांत्रिक कौशल्य असणार्‍या तरुणांना या क्षेत्रात भराभर नोकर्‍या मिळतात हे सर्वांना माहीत आहेच. त्याशिवाय सध्या देशात सर्वाधिक पगार मिळणारी नोकरी याच क्षेत्रात आहे. त्यामुळेही याकडे सर्व लोक आकर्षित झालेले आहेत. मात्र अशा नोकर्‍या मिळविण्यासाठी नेमके कोणते शिक्षण घेणे आवश्यक आहे. या संबंधात बरेच संभ्रमाचे वातावरण आहे. शक्यतो या क्षेत्रात येणार्‍या तरुण-तरुणींनी एम.सी.ए. ही पदवी घेणे अधिक श्रेयस्कर आहे. ही पदवी घेणार्‍यांचा या क्षेत्रातला प्रवेश सोपा होतो आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कामे करताना या पदवीच्या काळात घेतलेले शिक्षण उपयुक्त ठरत असते.

एम.सी.ए. या पदवीविषयी बर्‍याच जणांना माहितीही आहे. परंतु बरेचसे तरुण आणि तरुणी एम.सी.ए. च्या पदव्या घेऊन फसलेल्या आहेत. केवळ एम.सी.ए. आहे या एका पात्रतेवर नोकरी मिळत नाही. ती एम.सी.ए. डिग्री कोठून घेतलेली आहे याला बरेच महत्व दिले जात असते. म्हणून एम.सी.ए. करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांनी आपण त्यासाठी जिथे प्रवेश घेत आहोत ती संस्था मान्यताप्राप्त, चांगल्या विद्यापीठाशी संलग्न आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. किंबहुना नोकर्‍यांच्या क्षेत्रामध्ये ज्या विद्यापीठांना मान दिला जातो त्या विद्यापीठांची नावे माहीत करून घेऊन घ्यावीत ते अधिक सोयीस्कर ठरेल. एम.सी.ए.ला प्रवेश घेण्यासाठी बेसिक पदवी कोणतीही घेतली तरी चालते. आर्ट, कॉमर्स, सायन्स या विद्या शाखांच्या पदव्या घेणार्‍या विद्यार्थ्यांना एम.सी.ए.ला प्रवेश मिळू शकतो.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखांची पदवी मिळवणार्‍या विद्यार्थ्यांनासुद्धा एमसीएला प्रवेश दिला जातो. त्यातली महत्वाची अट अशी की, बारावीनंतर तीन वर्ष शिक्षण घेतलेले असले पाहिजे. असे असले तरी बारावीनंतर बीसीए ही डिग्री घेऊन एमसीएला प्रवेश घेणे अधिक श्रेयस्कर असते. कारण बीसीएच्या अभ्यासक्रमात अशा विद्यार्थ्याला एमसीएच्या अभ्यासक्रमाचा बराच भाग झालेला असतो. त्याला एमसीएचा अभ्यासक्रम सोपा जातो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची एमसीएची पदवी अधिक प्रतिष्ठेची मानली जाते. या संस्थेच्या अखिल भारतीय प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.

या संस्थेच्या शाखा देशातल्या अनेक शहरांमध्ये पसरलेल्या आहेत. त्यामुळे ही प्रवेश परीक्षा अलाहाबाद, बंगलोर हैदराबाद, नागपूर आदि २१ शहरांतील परीक्षा केंद्रांवर घेतली जाते. विद्यार्थ्यांनी या संबंधात येणार्‍या जाहिरातींवर लक्ष ठेवले पाहिजे. कारण ही संस्था तिच्याकडे येणार्‍या अर्जांच्या संख्येवरून परीक्षा केंद्रांचा निर्णय घेत असते. प्रवेशासाठी उत्सुक असणार्‍यांनी या संबंधातल्या जाहिरातीवरही लक्ष ठेवले पाहिजे.

Leave a Comment