उद्योजकता

उद्योजकता हा माणसाला जन्मत:च प्राप्त होणारा गुणधर्म आहे असे मानले जाते. पण आता आता याही विषयाचे अनेक मार्गदर्शक वर्ग निर्माण झाले आहेत.  एखादा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्याला उद्योजक होता येईल, असा दावा आता या अभ्यासक्रमाचे संयोजक करीत आहेत. तेव्हा एखाद्याला कारखानदार किंवा उद्योगपती बनवणारा अभ्यासक्रम आहे का, असा प्रश्‍न केला तर त्याचे उत्तर होय असे आहे. घरात उद्योगाची कसलीही परंपरा नसलेले अनेक लोक (पहिल्या पिढीतले उद्योजक) या क्षेत्रात येतात. अनेक अडचणी सहन करून आणि धक्के खात, अनेक अपयशे  पचवून शेवटी यशस्वी होतात. या प्रवासात आलेले अनेक प्रकारचे अनुभव हेच त्यांना शिकवत असतात आणि त्या अनुभवातूनच ते घडत असतात. मात्र त्यांना उद्योजकतेचे धडे कॉलेजात घेता आले तर त्यांची वाटचाल अधिक सुकर होते आणि बसणारे धक्के कमी होतात. अशा उद्योजकांची वाटचाल काही वेळा इतकी संघर्षमय असते की त्यांना उशिरा यश मिळते. त्यांना आपल्या हयातीत या यशाची फळे चाखता येत नाहीत. त्यांची पुढची पिढी ते लाभ घेत असते. अशा लोकांना उद्योजकतेचे धडे मिळाले असते तर त्यांना २० वर्षात मिळालेले यश १० वर्षांत मिळाले असते. म्हणून उद्योजकता हा विषय तयार करण्यात आला आहे. या विद्या शाखेचे शिक्षण नेमके कसे द्यावे याची निश्‍चिती करण्यात आलेली नसल्याने अनेक संस्था आपापल्या परीने त्याचे शिक्षण  देत आहेत.

काही संस्थांनी हा व्यवस्थापन शास्त्राचाच एक विषय केला आहे, तर काहींनी एम. बी. ए. नंतरचा केवळ याच विषयाला वाहिलेला पदविका किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेला आहे. काही संस्थांनी आता बारावी नंतरची याच विषयाला वाहिलेली पदवी निर्माण केली आहे. पुण्यात सिंबायोसिसमध्ये हा अभ्यासक्रम आहे. मात्र, भारती विद्यापीठाने १९७८ साली पहिल्यांदा `इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड एन्टरप्रिनरशिप’ अशी संस्था निर्माण करून या विषयाचा अभ्यासक्रम सुरू केला. एवढ्या आधी या नाविन्यपूर्ण विषयाला हात घालण्याचे श्रेय भारती विद्यापीठाला आहे. आधी ही संस्था पुणे विद्यापीठाशी संलग्न होती. पण २००१ सालपासून तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. देशातील नामवंत समजल्या जाणार्‍या `इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेच्या अहमदाबाद, बंगलोर, कोझीकोडे, लखनौ, रांची, कोलकत्ता, शिलॉंग, इत्यादी सर्व शाखांत उद्योजकतेशी संबंधित अभ्यासक्रम आहेत. दिल्लीच्या जामिया मीलिया इस्लामिया या संस्थेत तसेच आयआयएफटी नवी दिल्ली, या संस्थेतही या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम आहेत. सोलापूर जवळच्या वडाळा येथील श्रीराम शिक्षण संस्थेनेही बारावी नंतरचा बी.एससी. (उद्योजकता) हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे.