मुजोर टेनिसपटूना डेव्हीस कप संघातून डच्चू

नवी दिल्ली: आपसात हेवेदावे आणि मनमानी करणार्‍या हेकेखोर वरिष्ठ टेनिस खेळाडूंना अखिल भारतीय टेनिस महासंघाने अखेर बाहेरचा रस्ता दाखविला आहे. डेव्हीस कप टेनिस स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघातून लिएंडर पेस, महेश भूपती, रोहन बोपण्णा या दिग्गजांसह सोमदेव देवदेवबर्मन यालाही डच्चू देण्यात आला आहे.

भारतीय टेनिस संघ पुढच्या महिन्यात न्यूझीलंडबरोबर डेव्हिस चषक स्पर्धा खेळणार आहे. अनुभवी खेळाडू संघात नसल्याने भारतीय संघाचा प्रभाव या स्पर्धेत निश्चितपणे उणावणार आहे. मात्र ही किंमत मोजूनही महासंघाने ज्येष्ठ खेळाडूंची मुजोरी मोडून काढण्याचा निर्णय घेतल्याचे संघ निवडीवरून दिसून येते.

लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत पेस याच्या जोडीने खेळण्यास भूपती आणि बोपण्णा या दोघांनी नकार दिला होता. त्यामुळे पेसच्या जोडीला नवख्या विष्णुवर्धनला देण्यात आले. मिश्र दुहेरीत पेसच्या साथीने सानिया मिर्झाला उतरविण्यात आले.

ऐन ऑलिम्पिकच्या तोंडावर एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्याच्या आणि आपले घोडे दामटण्याच्या खेळाडूंच्या मुजोरीपुढे महासंघाने मान तुकविली होती. मात्र ऑलिम्पिकमध्ये या खेळाडूंनी केलेल्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महासंघाने कडक भूमिका घेतली आहे.

Leave a Comment