नवी दिल्ली: कॅगने केंद्र सरकारच्या तोंडाला कोळशाचे काळे फासले असले तरीही काँग्रेसने कॅगला आकडे फुगवून सांगण्याची सवय असल्याचा आरोप केला आहे.
कॅगने मर्यादेत रहावे: काँग्रेसची दमबाजी
कोळशाच्या खाणी लिलावाशिवाय मनमानी पद्धतीने देऊन सरकारने १ लाख ८६ हजार कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचे प्रकरण कॅगने आपल्या अहवालात उघड केले आहे. या आरोपांचे शिंतोडे पंतप्रधानांच्या अंगावर उडाल्याने सैरभैर झालेली कॉग्रेस आता कॅगलाच लबाड ठरवू पहात आहे.
देशाच्या विकासासाठी तातडीने उर्जेची आवश्यकता असल्याने मागेल त्याला खाण देण्याचे धोरण सरकारने राबविले. त्यात लिलाव करून पैसे कमाविण्याचा किंवा खाजगी कंपन्यांची धन करण्याचा उद्देशच नव्हता; असे सांगत काँग्रेस प्रवक्ते मनीष संघवी यांनी सरकारला सावरण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी त्यांनी कॅगवर मर्यादा उल्लंघनाचा आरोप केला. कॅगने आपल्या अहवालात कोणतीही आकडेवारी देणे अपेक्षित नसताना कॅग वारंवार आकडेवारी देऊन आपल्या मर्यादा ओलांडत आहे; असा आरोप करून कॅगने मर्यादेत रहावे; असा दमही सिंघवी यांनी भरला.
