रिटेल मॅनेजमेंट

किरकोळ विक्रीच्या क्षेत्रामध्ये भारत हा देश जगातल्या पहिल्या दहा वेगाने वृद्धिंगत होणार्या बाजारपेठेचा देश म्हणून ओळखला जात असतो. सध्या भारतामध्ये या क्षेत्रात परदेशी भांडवल किती मान्य केले जावे यावरून वाद सुरू झालेला आहे. परंतु कधी ना कधी रिटेल व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये परदेशी भांडवलाला परवानगी द्यावी लागणार आहे आणि ती दिली जाईल तेव्हा या सुसंघटित किरकोळ विक्रीच्या दुकानांमध्ये आजच्या सुशिक्षित तरुणांना प्रचंड प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे.

भारतामध्ये माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र वेगाने विकसित होत असल्याचे सांगितले जाते खरे, परंतु किरकोळ विक्रीचे हे क्षेत्र त्यापेक्षाही अधिक गतीने विकसित होत चाललेले आहे. सध्या भारतामध्ये या क्षेत्रात ३२ लाख ५० हजार नोकर्या उपलब्ध आहेत आणि या क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढली की, रिकाम्या जागांची ही संख्या काही कोटींपर्यंत जाणार आहेत. कारण या क्षेत्राचे नाव किरकोळ विक्रीचे क्षेत्र असे असले तरी प्रत्यक्षात या क्षेत्रामध्ये नोकरी करणार्या कर्मचार्यांना आणि कामगारांना ठोक प्रमाणात खरेदी करणे, मांडणी करणे, जाहिरात करणे, गोदाम व्यवस्थापन, जनसंपर्क अशा किती तरी क्षेत्रांचा अभ्यास करावा लागतो आणि त्याला एवढ्या क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ असावे लागते. रिटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात एन्ट्री पॉईंटला साधा सेल्समन म्हणून नोकरी मिळते. बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या नोकर्या फारसे कसलेही अभ्यासक्रम पूर्ण न करता मिळू शकतात. असे असले तरी सध्या विविध स्वयंसेवी संघटना रिटेल व्यवस्थापनाचे महिनाभराचे अभ्यास-क्रम आयोजित करत आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारा बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सीएसए म्हणून नोकरी मिळवू शकतो. ज्या ठिकाणी असे अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी उपलब्ध असलेले सुपर मार्केट किंवा मॉलचे व्यवस्थापन स्वत:च अशा कर्मचार्यांना प्रशिक्षण देऊन कामावर ठेवते.

मात्र ही नोकरी मिळविण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडे चांगले संवाद कौशल्य आणि बराच वेळ उभे राहण्याची क्षमता असण्याची गरज आहे. त्याशिवाय त्याला उत्तम प्रॉडक्ट नॉलेज असले पाहिजे. जे प्रशिक्षणातून प्राप्त होऊ शकते. या क्षेत्रातील काही नोकर्या वरच्या स्तरावरच्या आहेत.

विक्रेत्याच्या वर फ्लोअर सुपरवायझर, फ्लोअर मॅनेजर, सेल्स मॅनेजर किंवा असिस्टंट मॅनेजर अशा जागा असतात. पदवीधर विद्यार्थ्यांना अशा जागांसाठी थेट अर्ज करता येतो किंवा बीबीएचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अशा जागांची भरती करताना प्राधान्य दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांनी बीबीए पदवी घेताना रिटेल मॅनेजमेंटचे स्पेशलायझेन केलेले असेल त्याही विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये चांगले करिअर करता येते. एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा वरच्या पदांवर नेमणूका मिळू शकतात. 

 

Leave a Comment