देशात सहा महिन्यात डेटा ट्रॅफिक दुपटीने वाढला

नवी दिल्ली दि.१७ – देशात डेटा ट्रॅफिकचा वेग डिसेंबर २०११ ते जून २०१२ या सहा महिन्यांच्या कालावधीत दुपटीपेक्षा अधिक वाढला असल्याचे नोकिया सिमेन्स नेटवर्क डेटाच्या एमबिट इंडेक्स सर्वेक्षणात निष्पन्न झाले असून हे प्रमाण जून २०१३ पर्यंत कल्पनेपलिकडे वाढेल असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. परिणामी मोबाईल ब्रॉडबँडचा ग्राहक कायम टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्याला उत्तम क्वालिटीची सेवा पुरवून त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हायक्वालिटी ब्रॉडबँड सेवा उपलब्धता त्वरीत वाढवून देण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. सर्वेक्षणात गेल्या सहा महिन्यात डेटा ट्रॅफिकमध्ये ५४ टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

नुकत्याच सुरू झालेल्या थ्रीजी डेटा ट्रॅफिकमध्ये याच काळात तब्बल ७८ टक्के वाढ झाली असून टूजी मध्ये ही वाढ ४७ टक्के इतकी आहे. नोकिया सिमेन्स देशातील ३० टक्के डेटा ट्रॅफिक पुरवत असून देशातील सुमारे तीस कोटी ग्राहकांना ही सेवा दिली जात आहे. सेवा सुरळीत आणि ग्राहकाच्या अपेक्षा पूर्ण करणारी हवी आणि त्यासाठी हायक्वालिटी ब्रॉडबँड सेवा उपलब्धता वाढविली गेली पाहिजे असे कंपनीचे प्रमुख संदीप गिरोत्रा यांचे म्हणणे आहे.

गिरोत्रा यांच्या म्हणण्याप्रमाणे टूजीमुळे देशात मोबाईल ब्रॉडबँडचा प्रसार आणि प्रचार वेगाने होण्यास खूपच मदत झाली. थ्रीजीमुळे हा वापर कल्पनेपलिकडे वाढण्याची शक्यता आहे. विविध पातळ्यावर ग्राहक या सेवा घेत आहेत. थ्रीजी प्रतिमहिना ४०० एमबीचे ट्रॅफिक हाताळत आहे तर टूजीसाठी हेच प्रमाण १०० एमबी आहे. सध्या या सेवांच्या दरात कपात झाली असल्याने ग्राहकांची संख्याही वाढती आहे आणि मेट्रोमधील ग्राहक थ्रीजीचा वापर अधिक करू लागले आहेत. टूजी वापराचे प्रमाण तुलनेते स्थिर आहे.

Leave a Comment