केरळमध्ये जेवढी हिंदू मंदिरे आहेत त्यात सर्वाधिक पूजले जाणारे दैवत म्हणजे विष्णू. अर्थात विष्णूच्या दशावतारातील आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. कोचीनपासून जवळच असलेले थ्रिसूर जिल्ह्यातील श्रीकृष्णाचे गुरूवायूर हे मंदिर आवर्जून पाहावे असे. या मंदिराला भूलोकीचे वैकुंठ असे संबोधिले जाते. मंदिरात असलेली श्रीकृष्णाची चर्तुभूज मूर्ती दृष्ट लागेल अशी. पांचजन्य शंख, सुदर्शन चक्रधारी, कौमुदकी म्हणजे कमलधारी आणि गळ्यात तुळशीमाळ असलेली ही मूर्ती वसुदेव देवकीला कृष्ण जसा दिसला तशी बनविली गेल्याचे सांगितले जाते. या ठिकाणाला दक्षिणेची द्वारका असेही म्हणतात. येथील श्रीकृष्ण अनेक नावांनी ओळखला जातो. कन्नन, उन्नीकन्नन, बाळकृष्ण, गुरूवायुरप्पन अशी अनेक नांवे. या मंदिरातील पूजाअर्जा आदि शंकराचार्यांनी घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे केली जात असे. नंतर तांत्रिक लिखित नियम त्यासाठी करण्यात आले. नंबुद्रिपाद पुजार्यांकडे पूजेचा मान आहे.

वैष्णवांचे हे मुख्य श्रद्धास्थान असले तरी या मंदिराचा कृष्णाची जी १०८ पूज्य मंदिरे मानली जातात त्यात समावेश नाही. पाच हजार वर्षांपूर्वीचे हे मंदिर असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्ष उल्लेख सापडतात ते १४ व्या शतकापासून. त्यात या स्थानाचा कुरूवायूर असा उल्लेख येतो. कुरूवाई म्हणजे समुद्र. म्हणूनही हे कुरूवायूर असावे. हे मुख्य मंदिर १६३८ सालात परत बांधून काढल्याचे पुरावे आहेत. १७१६ सालात डचांनी हे मंदिर लुटले होते. १७४७ मध्ये हैदर अलीनेही या मंदिरावर स्वारी केली. मात्र मंदिर पाडू नये म्हणून त्याकाळी त्याला १० हजार फनाम देऊन मंदिर वाचविले गेले. १७८९ मध्ये टीपू सुलतानाने मलबारवर स्वारी केली तेव्हा मूर्तीची तोडफोड होऊ नये म्हणून त्या हलविल्या गेल्या. मंदिराला आग लागली तेव्हा इतका जोरदार पाऊस आला की ती आपोआप विझली असेही सांगितले जाते.

मूळ मूर्ती १७९२ मध्ये पुन्हा स्थापल्या गेल्या. या मंदिरामागची कथा मोठी रोचक आहे. शंकर महादेव सरोवराकाठी कित्येक वर्षे विष्णूकृपेसाठी तपस्या करत होते. त्यावरून येथील सरोवराला रूद्रतीर्थम असे नांव पडले. नंतर तेथेच तत्कालीन राजा, राणी आणि त्यांचे दहा पुत्र यांनी तपस्या केली. तेव्हा शंकराने विष्णूस्तुती करणारे स्त्रोत्र त्यांना दिले. पूजेसाठी दिलेल्या मूर्तीची खुद्द विष्णूने वैकुंठात पूजा केली. नंतर ही मूर्ती ब्रह्माला दिली व त्याने ती राजाला दिली असे सांगतात. त्याचबरोबर दुसरी कथा अशी की द्वारका बुडाली तेव्हा ही मूर्ती समुद्रावर तरंगत आली. उद्धव या शिष्याने ही मूर्ती काढली व ती ब्रह्मदेवाला योग्य जागी स्थापण्यासाठी दिली. ब्रह्मदेव ही मूर्ती वायूच्या सहाय्याने हवेतून नेत असताना हे ठिकाण त्यांना दिसले. तेथे शिवपार्वती नृत्य करत होते. तेथेच ही मूर्ती स्थापण्यात आली. ब्रह्मदेव म्हणजे देवांचे गुरू. आणि वायूर म्हणजे वारा. म्हणूनही हे गुरूवायूर.

असेही सांगितले जाते की ज्या दगडापासून ही मूर्ती बनविली गेली आहे तो दगड मॅग्नेटिक गुणधर्माचा तसेच औषधी गुणधर्म असलेला आहे. पहाटे तीन वाजताच पुजारी या मूर्तीची पूजा करतात. पूजा करताना मूर्तीला घातलेल्या स्नानातून जे तीर्थ बाहेर येते ते फार महत्त्वाचे मानले जाते. हे औषधी तीर्थ घेण्यासाठी पहाटेच भाविक येथे गर्दी करतात. मंदिराचे नियम कडक असून आत प्रवेश करताना पुरूषांना लुंगी नेसणे तसेच महिलांनी साडी, परकर पोलके असाच पोशाख करावा लागतो.

मंदिराचे आवार प्रचंड मोठे आहे. खास केरळी कौलारू बांधणीचे प्रचंड मोठे प्रकार असून आत दोन्ही बाजूंनी स्तंभांची लांबच लांब रांग आहे. मंदिराचा गाभारा खूपच आत असून दर्शन बाहेरूनच घ्यावे लागते. येथेही गाभार्यात वीजेचे दिवे वापरले जात नाहीत त्यामुळे मोठमोठ्या समयांच्या प्रकाशातच मूर्ती पाहायची. गर्दी प्रचंड असते. प्रसाद घ्यायचा असेल तर आपल्या इच्छेप्रमाणे पैसे भरून तो घेता येतो. गव्हाची खीर, गूळ असा प्रसाद असतो.

१९७० साली ३० नोव्हेंबरला या मंदिराला पुन्हा एकदा मोठी आग लागली होती. एकादशीनिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई केली होती. त्यावेळी रात्री कधीतरी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली व ती वेगाने पसरली. मात्र भल्या पहाटे पूजेसाठी उठलेल्या पुजार्यांना ही बाब लक्षात आली आणि आग लगोलग विझविली गेली. मात्र मूळ मंदिर आणि आवारातल्या अन्य मंदिरांचे कोणतेही नुकसान झाले नाही असेही सांगितले गेले.