किंग फिशरच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार

बंगळुरू: किंग फिशर एअरलाईन्सच्या आर्थिक व्यवहारांची काटेकोर चौकशी करण्याचे आदेश कंपनी रजिस्टार कार्यालयाने दिले आहेत. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या किंग फिशर एअरलाईन्सच्या दुरवस्थेला व्यवस्थापनाचा आर्थिक गैरव्यवहार जबाबदार असल्याचा आरोप करून कंपनीच्या भागधारकांनी कंपनी रजिस्टारकडे याबाबत तक्रार केली आहे.

या तक्रारीची दाखल घेऊन कंपनी रजिस्टार कार्यालयाने कंपनीच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे कंपनीने सन २००९-१० आणि सन २०१०-११ या आर्थिक वर्षात घेतलेली एकूण कर्ज, कर्जातील हिस्सेदारी, दैनंदिन आणि नियमित खर्च याचे सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.

कंपनीच्या प्रवक्त्याने मात्र या आदेशांना तांत्रिक कारवाई असे संबोधले आहे.

कंपनीवर एकूण ७ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा असून कंपनीची घसरण सुरूच आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत कंपनीला साडेसहाशे कोटीहून अधिक रुपयांचा तोटा झाला आहे.

Leave a Comment