मायक्रोमॅक्सचा तीन सिमचा फोन बाजारात

मुंबई, १७ ऑगस्ट-मोबाइलचे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होते आहे. सध्या सॅमसंगच्या ’स्मार्ट फोन’वर तरुणाई फिदा असताना, त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सने क्यू-३६ हा तीन सिमकार्डचा फोन बाजारात आणून ’ड्युएल सिम’चा जमाना गेल्याची वर्दी दिली आहे.

एक कंपनी फ्री मेसेजचा प्लॅन देते आणि दुसर्‍या कंपनीचे थ्री जी कनेक्शन स्वस्त पडते किंवा त्यांचे कॉल चार्जेस कमी आहेत, रोमिंग फ्री आहे, अशा कारणांसाठी अनेकजण ’ड्युएल सिम’ फोन घेणे पसंत करतात. कधी एका नेटवर्कने दगा दिला, तर दुसर्‍याचा आधार, म्हणूनही हे फोन बरे पडतात. पण आता, मायक्रोमॅक्सने क्यू-३६ द्वारे एकाच फोनमध्ये तीन सिमकार्ड वापरण्याची सोय केली आहे. क्वार्टी की-पॅडचा हा मोबाइल तीन सिम कार्ड सपोर्ट करतो. दोन जीएसएम आणि एक सीडीएमए कार्ड यात वापरता येतील.

’क्यू-३६’च्या की-पॅडवर प्रत्येक सिमकार्डावरून फोन लावण्यासाठी वेगवेगळे बटण देण्यात आले आहे. ’उ’ हे अक्षर असलेले बटण वापरून सीडीएमए नेटवर्कवरून फोन लावता येईल. या मोबाइलचा डिस्प्ले २.३ इंचाचा आहे. फोनमध्ये ऑडिओ-व्हिडिओ प्लेअर आहे. व्हिडिओ प्लेअरमध्ये एमपी-४ ची फाइलही आपण चालवू शकतो. आठ जीबीपर्यंत या फोनची मेमरी वाढवता येईल. त्याशिवाय, क्यू-३६ मध्ये ब्ल्यू टुथ, जीपीआरएस आणि यूएसबी या सुविधाही उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात या फोनची किंमत ४,२९९ रुपये आहे. तीन सिमचा हा फोन मोबाइलवेड्या तरुणांना नक्कीच भुरळ पाडू शकेल.