उमद्या नेतृत्वाचा अस्त

लातूरचे वैभव आणि महाराष्ट्राचे नेते मा. विलासराव देशमुख यांचे काल चेन्नईच्या खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते अवघ्या ६७ व्या वर्षी गेले. एवढ्या कमी वयातले त्यांचे जाणे हे मोठेच धक्का देणारे आहे. त्यांना चेन्नईच्या रुग्णालयात गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आले तेव्हा ते अत्यवस्थ होते आणि त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते मात्र दोन दिवसांनी त्यांच्यावर यकृत रोपणाची शस्त्रक्रिया केली तर ते या आजारातून उठतील असे वाटायला लागले होते. गेला आठवडा त्यांच्या आजाराबाबत चढ उताराचा ठरला. अखेर यकृताचे रोपण करण्यासाठी आवश्यक ती अनुकूल स्थितीही उरली नाही. दोन्ही मूत्रपिंडे बाद झाल्याने त्यांनी काल शेवटचा श्वास घेतला.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर आपला ठसा उमटवणारे एक उमदे मुख्यमंत्री आपल्यातून गेले आहेत आणि सार्‍या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. विलासरावांनी आमदार होऊन महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपायला सुरूवात केली तेव्हापासून त्यांचे आणि मराठवाडा नेताचे संबंध होते. मराठवाडा नेता या दैनिकाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले होते आणि या दैनिकाच्या प्रगतीच्या प्रत्येक पायरीवर मराठवाडा नेताने त्यांच्याच हस्ते श्रीफळ वाढवून पाय ठेवला होता.

विलासराव देशमुख यांची कारकीर्द बाभळगावचे सरपंच म्हणून सुरू झाली आणि ती केन्द्रीय मंत्रिपदापर्यंत येऊन ठेपली. ही बाब कौतुकाची वाटतेच पण या वाटचालीत त्यांनी जे जे चढ उतार पाहिले आणि अनुभवले त्या त्या चढ उतारांना त्यांनी ज्या पद्धतीने तोंड दिले त्या पद्धतीचेही कौतुक वाटते. बाभळगावच्या सरपंचपदाच्या आधी त्यांची राजकीय जडणघडण मा. शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. त्यांनी तिथे शालीनता आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा यांची दीक्षा घेतली. नंतरच्या राजकारणात विलासरावांनी आपल्या खास भाषेत अनेकांना कोपरखळ्या मारल्या, क्वचित नर्म विनोदी शैलीत चिमटेही घेतले पण कोणाला बोचकारले नाही आणि कोणाचे वाभाडेही काढले नाहीत.त्यांचे चिमटेही इतके प्रसन्न असत की, ते ज्याला घेतले असतील त्यालाही हसू यावे.

शालेय शिक्षण घेताना त्यांनी फार कष्टाने घेतले होते हे कदाचित अनेकांना माहीतही नसेल. आजच्या अलंकार थिएटर समोरच्या एका खोलीत ते आपल्या भावंडांसह रहात असत आणि गावाकडून आलेल्या भाकरी खाऊन शाळेत जात असत.त्या काळात श्रीमंतांची मुले मारवाडी राजस्थान मध्ये आणि गरिबांची मुले सरकारी शाळेत जात असत. विलासराव सरकारी शाळेत होते हे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. त्यांनी दयानंद कॉलेजमधून विज्ञानाची पदवी प्राप्त करून कायद्याचे शिक्षण घेतले पण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये डेमाँस्ट्रेटर म्हणून वर्षभर काम केले. कायद्याचे शिक्षण घेतले असले तरीही अंगावर काळा कोट घालण्याच्या आधीच १९७३ साली त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्याही असतील पण ते कॉलेज मध्ये व्हॉलीबॉलपटू म्हणून नावाजले गेले होते.

सरपंच झाले तरी बहुजन समाजातले ग्रामीण भागातले सुशिक्षित तरुण म्हणून त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि १९७३ ते १९८० सालपर्यंत लातूर पंचायत समितीचे उपसभापतीपद भूषविले. या दरम्यान मोठ्या राजकारणात उडी घेण्याची संधी मिळण्यासाठी त्यांना १९८० च्या विधानसभा निवडणुकीची वाट पहावी लागली. ते त्यावषीं लातूर जिल्हयातले सहकार महर्षी समजले जाणारे शिवाजीराव नाडे आणि लातूर शहरात नावाजले गेलेले जनता पाटींचे नेते मनोहरराव गोमारे यांचा पराभव करून निवडून आले. आमदार झाल्यानंतर तीनच वर्षात त्यांना मंत्री होण्याची संधी मिळाली. नंतर त्यांची वाटचाल जारी राहिली खरी पण शिवाजीराव निलंगेकर हे मुख्यमंत्री होताच त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. खरे तर त्यांनी मंत्री झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या हुशारीची चमक दाखवली होती. प्रथम मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे जवळपास सात खाती होती पण, त्या सर्व खात्यांच्या संबंधात काही प्रश्न निर्माण होते तेव्हा ते अभ्यासपूर्ण आणि नेमके उत्तर देतात अशी त्यांची ख्याती निर्माण झाली होती. असे असतानाही त्यांच्या जोरदार वाटचालीला हा पहिलाच धक्का बसला पण हा गॅप फार मोठा राहिला नाही. १९८४ साली ते पुन्हा मंत्रिमंडळात आले आणि तळपत राहिले.

१९९५ साली त्यांना मतदारसंघानेच नाकारले पण शांतपणे हा पराभव पत्करून त्यांनी नंतर एकदम मुख्यमंत्री पदावरच झेप घेतली. याही पदावरून त्यांना दोन वेळा प्रतिकूल धक्के बसले. पण तेही सहन करून ते टिकून राहिले. काँग्रेसमध्ये एक वेळ अशी आली की आता राज्यात विलासराव देशमुख यांच्या इतका तगडा नेता उरला नाही. म्हणूनच २००९ साली त्यांना केन्द्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आले. तिथे आपल्या कार्यकुशलतेचा परिचय देत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.